२,१७९ लाभार्थ्यांचे ॲग्रिस्टॅक पूर्ण करण्यासाठी तालुकास्तरीय शिबिरे आयोजित करा

जिल्हाधिकारी सावनकुमार

    दिनांक :13-Aug-2026
Total Views |
भंडारा,
district collector savankumar पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण २२,३८५ शेतकरी लाभार्थ्यांची यादी प्राप्त झाली आहे. त्यापैकी ११,९४९ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण दि. ११ ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे २०,३३५, तर राष्ट्रीयकृत, खाजगी व ग्रामीण बँकांचे २,०५०, असे एकूण २२,३८५ शेतकरी लाभार्थी कर्जमाफीसाठी पात्र यादीत आहेत.
 
district collector savankumar
 
शिल्लक लाभार्थ्यांपैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे १,७८६ तसेच राष्ट्रीयकृत, खाजगी व ग्रामीण बँकांचे ३९३, असे एकूण २,१७९ लाभार्थ्यांचे ॲग्रिस्टॅक उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित शेतकऱ्यांचे ॲग्रिस्टॅक व फार्मर आयडी पूर्ण करण्यासाठी तालुकास्तरावर विशेष शिबिरे आयोजित करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ वेळेत मिळावा यासाठी आधार प्रमाणीकरण, ॲग्रिस्टॅक नोंदणी आणि फार्मर आयडीची पूर्तता यासंदर्भातील कार्यवाही वेगाने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
 
संबंधित लाभार्थ्यांचे फार्मर आयडी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू असून, उर्वरित लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक विलास देशपांडे यांनी यावेळी दिली. ९८ ऑनलाईन तक्रारींचे निराकरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधकांनी दिले. बैठकीस जिल्ह्यातील विविध बँकांचे अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.