गुड न्यूज! आता ऑनलाईन खरेदी करा खत

    दिनांक :13-Aug-2026
Total Views |
मुंबई
online fertilizer booking app राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. रासायनिक खत खरेदी करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले असून, आता खताची ऑनलाइन बुकिंग करता येणार आहे. यासाठी केंद्र सरकारने ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ हे ॲप तयार केले आहे. या सुविधेची १५ ऑगस्टपासून प्रायोगिक तत्त्वावर वाशिम जिल्ह्यात सुरुवात करण्यात येणार आहे.
 

online fertilizer booking app 
या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रासायनिक खताची थेट ऑनलाइन बुकिंग करता येणार आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या खतसाठ्याची माहितीही मोबाईलवरूनच तपासता येणार आहे. त्यामुळे खताच्या उपलब्धतेबाबतची माहिती सहज मिळण्यासोबतच शेतकऱ्यांना योग्य वेळी खत उपलब्ध होण्यास मदत होईल. खत वितरणाची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.
वाशिम जिल्ह्यात या ॲपची प्रायोगिक अंमलबजावणी होणार असल्याने त्याबाबतची माहिती गावपातळीपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील खत विक्रेत्यांना सध्या प्रशिक्षण दिले जात आहे. ॲपचा वापर कसा करायचा आणि त्याद्वारे खत विक्रीची प्रक्रिया कशी राबवायची, याबाबत विक्रेत्यांना मार्गदर्शन केले जात आहे.वाशिममधील प्रायोगिक टप्प्यानंतर राज्यातील इतर सर्व भागांतही ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ ॲप सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना या माध्यमातून खत खरेदी करता येईल. ऑनलाइन बुकिंग आणि उपलब्ध खतसाठ्याची माहिती मोबाईलवर मिळणार असल्याने खतासाठी होणारी धावपळ कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या नव्या सुविधेमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे खत खरेदीचे टेन्शन कमी होण्यास मदत होणार आहे.