मुंबई
nikhil damle स्वातंत्र्याचा अर्थ केवळ बंधनांपासून मुक्त होणे इतकाच मर्यादित नसून, त्यासोबत येणारी जबाबदारी स्वीकारणे आणि स्वतःला अधिक सक्षम बनवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘कमळी’ मालिकेतील ‘ऋषी’ अर्थात निखिल दामले, ‘सनई चौघडे’ मालिकेतील ‘असावरी’ अर्थात जुई गोगरी आणि ‘तारिणी’ मालिकेतील ‘कौशिकी’ अर्थात अभिज्ञा भावे यांनी स्वातंत्र्य, बदलता भारत, सामाजिक जबाबदारी आणि मनोरंजन क्षेत्रातील सकारात्मक बदलांविषयी आपले विचार मांडले.
गेल्या काही दशकांमध्ये भारतीयांमध्ये जाणवलेला सर्वात सकारात्मक बदल म्हणजे वाढलेला आत्मविश्वास, असे निखिल दामले यांना वाटते. शिक्षण आणि प्रोफेशननुसार नव्या संधी उपलब्ध होत असून, त्या संधींचा सदुपयोग करण्याची क्षमताही नागरिकांमध्ये वाढत असल्याचे ते सांगतात. मनोरंजन क्षेत्रातही हाच आत्मविश्वास दिसून येत असल्याचे नमूद करताना निखिल म्हणाला, “भारतीयांच्या आत्मविश्वासाने भारत देश पुढे अग्रेसर करत आहे. असाच आत्मविश्वास आज कलाकारांमध्ये, मनोरंजन क्षेत्रातसुद्धा आलेला आहे. ज्या प्रकारचे आपण विषय मांडत आहोत, सामाजिक म्हणा, इंटर पर्सनल रिलेशनशीपमधले विषय म्हणा, याव्यतिरिक्तही काही विषय आपण स्पष्टतेने, ठामपणे मांडत आहोत. मनोरंजन माध्यमातून नव्या पद्धतीची कलाकृती आपण हल्ली जगासमोर आणतोय. नवे नवे उत्तम विषय अधिक आत्मविश्वासाने सादर केले जात आहेत, ही खूप चांगली गोष्ट आहे आणि हे असंच चालू राहो, याचा मला आनंद आहे.”
स्वातंत्र्याचा स्वतःसाठीचा अर्थ स्पष्ट करताना निखिलने त्याकडे स्वतःला अधिक सक्षम करण्याची संधी म्हणून पाहिले. “स्वातंत्र्य म्हणजे स्वतःला अपग्रेड करण्याची एक संधी मला वाटते. जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य असतं, स्वतःचे स्वतः निर्णय घेण्याचं किंवा आपल्याला जे वाटतंय ते करण्याचं स्वातंत्र्य, तेव्हा आपल्याकडून खूप काहीतरी चांगली, छान गोष्ट घडू शकते, असं मला वाटतं,” असे तो म्हणाला.
पुढील पिढीला संदेश देताना निखिलने आत्मविश्वासासोबत देशाप्रती प्रेम, आदर आणि आत्मपरीक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. “देशाबद्दलचं प्रेम आणि आदर हा कधी कमी नाही झाला पाहिजे. आपल्या भारताला एक सुंदर इतिहास आहे, आपली खूप छान अशी भारतीय संस्कृती आणि संस्कार आहेत आणि त्या सगळ्याचा आपण सन्मान केला पाहिजे. कुठल्याही गोष्टीत उणीव दाखवण्याआधी आपण आपलं स्वपरीक्षणसुद्धा केलं पाहिजे. स्वपरीक्षणाने चांगलं आत्मसात करून आपण स्वतःचं आयुष्य चांगलं करत असतोच, पण त्यासोबतच आपण आपल्या आजूबाजूच्या, आपल्या सभोवतालच्या समाजाचंही भलं करत असतो,” असे त्याने सांगितले.
‘सनई चौघडे’ मालिकेतील ‘असावरी’ अर्थात जुई गोगरी हिच्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे स्वतःची ओळख निर्माण करण्याची आणि स्वतःचे विचार निर्भयपणे मांडण्याची ताकद आहे. “माझ्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे स्वतःची ओळख निर्माण करणं किंवा न घाबरता स्वतःचे विचार मांडणं असा आहे. जबाबदारीने वागणं, माझे निर्णय मी स्वतः घेणं. खरंतर मी माझ्या भूमिकांमधूनही हाच मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत असते. आपण किती सक्षम आहोत, आपण स्वतःसाठी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, हे मी सतत माझ्या भूमिकांमधून दाखवण्याचा प्रयत्न करत असते आणि करत राहणार,” असे जुईने सांगितले.
आजचा भारत आणि मनोरंजन क्षेत्र आत्मविश्वासाने पुढे जात असल्याचेही जुईने नमूद केले. “आजचा भारत नवीन विचारांनी आणि आत्मविश्वासाने पुढे जात आहे. मनोरंजनाचं क्षेत्र पण पूर्ण आत्मविश्वासाने पुढे पुढे जात आहे, असं मला वाटतं,” असे ती म्हणाली. चित्रपट आणि मालिकांमधून देशाच्या मातीतील प्रेरणादायी कथा आणि वीरांच्या गाथा प्रेक्षकांसमोर येत असल्याकडेही तिने लक्ष वेधले.
‘तारिणी’ मालिकेतील ‘कौशिकी’ अर्थात अभिज्ञा भावे यांच्या मते, गेल्या काही वर्षांत नागरिकांमध्ये सामाजिक जबाबदारी आणि जागरूकता वाढल्याचे अनेक छोट्या छोट्या उदाहरणांतून दिसून येते. कोविडनंतर नागरिकांमध्ये झालेला बदल सांगताना त्या म्हणाल्या की, रस्त्यावरून ॲम्ब्युलन्स जात असताना लोक तिच्यासाठी रस्ता मोकळा करून देतात. त्याचबरोबर प्राण्यांवर केली जाणारी कठोरता आणि त्यांच्याशी संबंधित प्रश्नांबाबतही अधिक जागरूकता निर्माण झाली आहे. लोक आपले मत मांडण्यासाठी पुढे येतात आणि चुकीच्या गोष्टींना विरोध दर्शवतात, या सगळ्यात विलक्षण वाढ झाल्याचे त्यांना वाटते.
महिला, वृद्ध आणि प्राण्यांच्या सुरक्षिततेबाबत वाढलेली जागरूकता, वाहतुकीचे नियम पाळण्याची वाढलेली सवय आणि भारतीय लघु उद्योगांना मिळणारा वाव, हेही सकारात्मक बदल असल्याचे अभिज्ञा सांगतात. तंत्रज्ञान आणि सोशल मीडियामुळे कलाकार तसेच लघु उद्योगांना लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी अधिक सहज उपलब्ध होत असल्याचेही त्या नमूद करतात.
एक कलाकार म्हणून सामाजिक जबाबदारी कशी जपता येते, याबद्दल अभिज्ञा म्हणाल्या, “काही खाजगी कार्यक्रमांमध्ये मला जेव्हा कलाकार म्हणून बोलावलं जातं किंवा मला जिथे जाण्याची संधी मिळते, जिथे मला शक्य होईल तिथे मी काही काही बदल सुचविण्याचे प्रयत्न नक्कीच करते. मी सुचवते की जिथे शाल आणि श्रीफळ देताय मान्यवरांना, तिथे एखादं तुळशीचं रोपटं द्या.”
आपल्या दैनंदिन वागण्यातूनही पर्यावरण आणि समाजाप्रती जबाबदारी जपण्याचा प्रयत्न करत असल्याचे अभिज्ञा यांनी सांगितले. नव्या पिढीला संदेश देताना त्या म्हणाल्या, “मी एवढंच सांगेन, कचरा करू नका, प्राण्यांना वाईट वागवू नका. स्वच्छता ठेवणं, करणं ही आपलीही जबाबदारी आहे. भले शासनाने कर्मचारी नेमलेले असतात, पण ही आपल्या सर्वांचीही जबाबदारी आहे. मुळात कचरा न करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे आणि ती प्रत्येकाने ओळखली पाहिजे. हे सध्याच्या पिढीला समजावून सांगणं, शिकवणं गरजेचं आहे, असं मला ठाम वाटतं. आपल्या सुरक्षिततेसाठी केलेले सर्व नियम आपण स्वतः आधी पाळले पाहिजेत, अशा मताची मी आहे. नवीन पिढीनेही हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे.”
स्वातंत्र्याचा अर्थ प्रत्येकासाठी वेगळा असला, तरी निखिल दामले, जुई गोगरी आणि अभिज्ञा भावे यांच्या विचारांमध्ये एक समान धागा स्पष्टपणे दिसतो. स्वातंत्र्य म्हणजे केवळ स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार नव्हे, तर त्या स्वातंत्र्यासोबत येणारी जबाबदारी स्वीकारणेही आहे. स्वतःची ओळख निर्माण करताना, निर्भयपणे विचार मांडताना, कलेच्या माध्यमातून नवे विषय प्रेक्षकांसमोर आणताना आणि समाजासाठी छोट्या छोट्या कृती करताना ही जबाबदारी जपली जाते. याच विचारांसह हे कलाकार यंदाचा स्वातंत्र्यदिन साजरा करत असून, स्वातंत्र्याची खरी भावना प्रत्येकाच्या कृतीतून जपली जावी, हाच त्यांचा संदेश आहे.