grow pumpkins in a pot भोपळा म्हटला की अनेकांच्या डोळ्यांसमोर मोठे शेत आणि दूरवर पसरलेल्या वेलींचे चित्र उभे राहते. मात्र, भोपळ्याची लागवड करण्यासाठी मोठी शेती असणे आवश्यक नाही. योग्य नियोजन केले तर गच्ची, बाल्कनी किंवा घराच्या मोकळ्या जागेतही भोपळ्याची भरघोस लागवड करता येते. योग्य पद्धतीने वाढवलेले घरच्या बागेतील ताजे भोपळे स्वयंपाकासाठीही उपयोगी ठरतात.घरच्या घरी भोपळा लावताना सर्वप्रथम योग्य आकाराची कुंडी किंवा ग्रो बॅग निवडणे महत्त्वाचे आहे. भोपळ्याची मुळे खोलवर आणि वेगाने वाढत असल्याने लहान कुंडीत रोपाची वाढ मर्यादित होऊ शकते. त्यामुळे किमान १८ बाय १८ किंवा २४ बाय २४ इंच आकाराची मोठी ग्रो बॅग वापरणे योग्य ठरते.

भोपळ्याच्या चांगल्या वाढीसाठी मातीही पोषक असणे गरजेचे आहे. यासाठी ४० टक्के सामान्य बागेतील माती, ४० टक्के चांगले कुजलेले शेणखत किंवा गांडूळखत आणि २० टक्के कोकोपीट व वाळू यांचे मिश्रण तयार करता येते. मुळांभोवती बुरशी किंवा कीटकांचा त्रास कमी करण्यासाठी त्यात दोन मूठ निंबाची पेंड मिसळता येते. कुंडीच्या तळाशी २ ते ३ निचरा छिद्रे असणे आवश्यक आहे, जेणेकरून अतिरिक्त पाणी साचणार नाही.भोपळ्याची वेल मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने कमी जागेत लागवड करताना उभ्या पद्धतीने वेल वाढवणे फायदेशीर ठरते. रोप साधारण १ ते २ फूट उंच झाल्यानंतर बांबूच्या काठ्या आणि मजबूत दोरीच्या साहाय्याने त्याला आधार देता येतो. वेल जमिनीवर पसरण्याऐवजी वर वाढल्यामुळे जागेची बचत होते आणि झाडाला हवा व सूर्यप्रकाशही चांगल्या प्रमाणात मिळतो.
भोपळ्याच्या रोपाला दररोज किमान ६ ते ७ तास थेट सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्रो बॅग शक्यतो मोकळ्या आणि सूर्यप्रकाश मिळणाऱ्या ठिकाणी ठेवावी. फळे तयार झाल्यानंतर त्यांचे वजन वाढते. अशावेळी वेल किंवा फळाचा देठ तुटू नये म्हणून जाळी किंवा अन्य मजबूत आधार देणे महत्त्वाचे ठरते.गच्चीवर किंवा बाल्कनीत भोपळ्याची लागवड करताना परागीभवनाकडेही विशेष लक्ष द्यावे लागते. अनेकदा फुले आल्यानंतर लहान भोपळे तयार होतात, मात्र काही दिवसांत ते पिवळे पडून गळून जातात. यामागे परागीभवन नीट न होणे हे एक कारण असू शकते. भोपळ्याच्या वेलीवर नर आणि मादी अशी दोन प्रकारची फुले येतात. मादी फुलाच्या मागे लहान भोपळ्यासारखी रचना दिसते.
बाल्कनी किंवा गच्चीवर मधमाश्यांची वर्दळ कमी असल्यास हाताने परागीभवन करता येते. सकाळच्या वेळी नर फुलाच्या पाकळ्या काढून त्यातील परागकण असलेला भाग मादी फुलाच्या मध्यभागाला हलक्या हाताने स्पर्श करावा. योग्य परागीभवन झाल्यास फळधारणा होण्याची शक्यता वाढते.रोपाच्या चांगल्या वाढीसाठी दर १५ ते २० दिवसांनी हलकी खुरपणी करून माती सैल करता येते. त्याचबरोबर मुळांजवळ मूठभर कंपोस्ट किंवा मोहरीच्या पेंडीचे द्रव खत देता येते. मात्र, पाणी देताना मातीचा वरचा थर कोरडा झालेला आहे की नाही, हे पाहणे महत्त्वाचे आहे. माती सतत ओलसर ठेवण्याऐवजी गरजेनुसार पाणी दिल्यास रोपाची वाढ चांगली होण्यास मदत होते. योग्य आकाराची ग्रो बॅग, पोषक माती, पुरेसा सूर्यप्रकाश, वेलीला मजबूत आधार आणि योग्य परागीभवन या गोष्टींकडे लक्ष दिल्यास घरच्या गच्चीवर किंवा बाल्कनीतही भोपळ्याची लागवड यशस्वीपणे करता येऊ शकते. कमी जागेत घरच्या घरी ताज्या भाज्या पिकवण्याचा हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.