बालिका अत्याचार प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षेचा इशारा

पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

    दिनांक :13-Aug-2026
Total Views |
भंडारा,
dr pankaj bhoyar जिल्ह्यातील साडेतीन वर्षीय बालिकेवरील अत्याचार प्रकरण हे अत्यंत दुर्दैवी व संतापजनक आहे .या घटनेची मुख्यमंत्री महोदयांनी गंभीर दखल घेतली असून, पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी शासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज दिली.
 
dr pankaj bhoyar
 
जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी तत्पूर्वी जिल्हाधिकारी सावन कुमार आणि अपर जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्याशी चर्चा करून सदर प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. प्रकरणातील तपासाची सद्यस्थिती, करण्यात आलेली कार्यवाही तसेच पुढील कार्यवाहीबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. यानंतर पालकमंत्र्यांनी पीडित बालिकेच्या घरी भेट देऊन तिच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. कुटुंबीयांना शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगत, आवश्यक ती सर्व शासकीय मदत उपलब्ध करून देण्याचे आश्र्वासित केले.
 
यावेळी पालकमंत्री डॉ. भोयर माध्यमांशी बोलताना म्हणाले, “घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून अशा घटना घडत असतात. या घटनेची मुख्यमंत्री महोदयांनीदेखील गंभीर दखल घेतली आहे. सदर प्रकरण फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवून आरोपीला लवकरात लवकर कठोरात कठोर शिक्षा मिळावी, यासाठी शासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील.” प्रकरणाचा तपास जलदगतीने व संवेदनशीलतेने पूर्ण करून दोषी व्यक्तीवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.