खड्डा चुकवण्याचा प्रयत्न अन् जीव गेला!

बंगळुरूमध्ये भीषण अपघात

    दिनांक :13-Aug-2026
Total Views |
बंगळुरू,
Horrific accident in Bengaluru बंगळुरूमध्ये रस्त्यावरील खड्ड्यामुळे घडलेल्या भीषण अपघातात ३२ वर्षीय ईपीएफओ कर्मचारी मेधा यांचा मृत्यू झाला. अनेकल तालुक्यातील हेब्बागोडीजवळ अनंतनगर मुख्य रस्त्यावर मंगळवारी सकाळी सुमारे ९ वाजता ही दुर्घटना घडली. दुचाकीवर मागे बसलेल्या मेधा रस्त्यावर कोसळल्यानंतर मागून आलेल्या ट्रकच्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.मेधा या मूळच्या केरळमधील कोझिकोड जिल्ह्यातील बालुसेरी येथील रहिवासी होत्या. त्या बंगळुरूमधील इलेक्ट्रॉनिक सिटी परिसरातील भविष्य निर्वाह निधी कार्यालयात कार्यरत होत्या. त्यांच्या पश्चात पती एस. एल. आकर्ष आणि ३ वर्षांचा मुलगा दक्ष असा परिवार आहे.
 

Horrific accident in Bengaluru 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, मेधा या त्यांचा मित्र आणि सहकारी अजय गुरू यांच्यासोबत मोटारसायकलवरून प्रवास करत होत्या. त्यांच्या पुढे असलेल्या कारच्या चालकाने रस्त्यातील खड्डा टाळण्यासाठी अचानक ब्रेक लावला. त्याचा परिणाम मागून येणाऱ्या दुचाकीवर झाला आणि दुचाकीचा तोल गेला. यावेळी मागे बसलेल्या मेधा रस्त्यावर पडल्या. त्याच क्षणी मागून आलेल्या ट्रकच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला.घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर गर्दी करून वाहतूक रोखत खराब रस्त्यांच्या स्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली. इलेक्ट्रॉनिक सिटी आणि आसपासच्या भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे असून, त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला.
 
 
 
अपघातानंतर मेधांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सेंट जॉन्स मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेण्यात आला. त्यानंतर त्यांचा मृतदेह विमानाने केरळमधील मूळ गावी पाठवण्यात आला. स्थानिक नागरिकांनी मेणबत्त्या पेटवून आणि प्रार्थना करून मेधांना श्रद्धांजली वाहिली.दरम्यान, हेब्बागोडी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, कार चालकाने अचानक ब्रेक लावल्याने दुचाकीचा तोल जाणे हे अपघाताचे तात्काळ कारण असल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या कोणत्याही व्यक्तीने ट्रकचा नोंदणी क्रमांक नोंदवला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघाताचा संपूर्ण तपास करण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. इलेक्ट्रॉनिक सिटी वाहतूक पोलीस ठाण्यात या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. या घटनेनंतर बंगळुरूमधील खराब रस्ते आणि पदपथांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरातील अनेक भागांमध्ये खड्डे, रस्त्यावर उभे असलेले खांब, सायकली, दुकाने आणि इतर अडथळ्यांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा सोशल मीडियावरही चर्चेत आला आहे. स्थानिकांनी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची मागणी केली आहे.