कारंजा लाड,
samruddhi mahamarg नागपूरहून नाशिकच्या सप्तशृंगीकडे जाणार्या टाटा सुमो गोल्डने समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. गुरुवार, १३ ऑगस्ट रोजी मध्यरात्री सुमारे १२.४० वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. या दुर्घटनेत टाटा सुमो गोल्डमधील सहा जण जखमी झाले असून, त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. अन्य तिघांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, एम.एच ४० सी.डी ९०८० क्रमांकाचा ट्रक समृद्धी महामार्गावरील सी.एच १७२ पेट्रोल पंपाजवळ उभा होता. रात्रीच्या सुमारास नागपूरहून नाशिकच्या सप्तशृंगीकडे टाटा सुमो गोल्डमधून प्रवासी जात होते. यावेळी सुमो गोल्डचे नियंत्रण सुटल्याने अथवा चालकाला उभा असलेला ट्रक वेळेत न दिसल्याने ट्रकच्या मागील बाजूस जोरदार धडक दिली. या धडकेत सुमो गोल्डचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि वाहनातील सहा प्रवासी जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्गावरील आयसी-०८ येथील १०८ रुग्णवाहिका पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पायलट रवि शिंदे, सोनू शिंदे आणि डॉ. गणेश यांनी घटनास्थळी पोहोचून जखमींची पाहणी केली. गंभीर जखमींना तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली.अपघाताची तीव्रता लक्षात घेता जखमींना विलंब न करता कारंजा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयात वैद्यकीय पथकाने जखमींवर उपचार सुरू केले.
अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहन आणि ट्रकची पाहणी करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.समृद्धी महामार्गावर रात्रीच्या वेळी वाहनचालकांना उभ्या असलेल्या वाहनांचा अंदाज न आल्याने अपघात होण्याचा धोका वाढतो. विशेषतः महामार्गावर वाहन बिघाड झाल्यास किंवा काही कारणास्तव वाहन थांबवावे लागल्यास सुरक्षा नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. संबंधित वाहनचालकांनी वाहन शयतो सुरक्षित ठिकाणी उभे करणे, वाहनामागे आवश्यक सुरक्षा व्यवस्था करणे आणि इतर वाहनचालकांना स्पष्टपणे सूचना मिळतील याची काळजी घेणे गरजेचे आहे. दरम्यान जखमींची नावे कळू शकली नाही. रुग्णवाहिका पथकाच्या तत्परतेमुळे अपघातातील जखमींना वेळेत वैद्यकीय उपचार मिळाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करता आले. आणि त्यांचा जीव वाचला.