कोलकाता,
isi agent arrested in bengal पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यात अटक करण्यात आलेल्या संशयित आयएसआय एजंट राणा रौफ खालिद उर्फ सनी उर्फ वहाब आलम याच्या चौकशीत तपास यंत्रणांना कथित आंतरराष्ट्रीय संपर्कांचे धागेदोरे मिळाले आहेत. मंगळवारी रात्री अटक झाल्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीत नेपाळ आणि बांगलादेशातील संशयित संपर्कांची नावे समोर आली असून, त्याच्या वहीत या व्यक्तींच्या नोंदी आढळल्याचे तपासात सांगण्यात आले आहे.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, राणाच्या वहीत नेपाळमधील काशिफ, हनीफ चौधरी, सोहेल, जेडी आणि हारून सफदर या पाच जणांची नावे होती. याशिवाय बांगलादेशातील पावेल नावाच्या व्यक्तीचीही नोंद आढळली. या संपर्कांच्या माध्यमातून संवेदनशील माहितीची देवाणघेवाण केली जात असल्याचा तपास यंत्रणांचा आरोप आहे. राणाने बंगालमधील विविध लष्करी छावण्या, बीएसएफच्या सीमा चौक्या, रेल्वे स्थानके आणि रेल्वे मार्गांशी संबंधित फोटो, व्हिडिओ तसेच नकाशे पाठवल्याचा आरोप आहे. या माहितीचा नेमका वापर कशासाठी केला जात होता आणि त्यामागे आणखी कोण व्यक्ती किंवा संस्था कार्यरत होती, याचा तपास सुरू आहे.
तपासादरम्यान आणखी काही व्यक्तींच्या भूमिकेवरही संशय व्यक्त करण्यात आला आहे. कोलकात्याच्या तापसिया परिसरातून अटक करण्यात आलेल्या मोहम्मद इजाज व्यतिरिक्त पूर्व कोलकात्यातील आणखी दोन व्यक्तींची भूमिका तपासली जात आहे. तपास अधिकाऱ्यांच्या मते, नेपाळमधील संपर्कांचे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने राणाने आपला मोबाईल फोन तोडला होता. मात्र, मोबाईल नष्ट केल्यानंतरही त्याने वापरलेली दोन सिम कार्डे नष्ट केली नसल्याचे समोर आले. विशेष कृती दलाने ही दोन्ही सिम कार्डे जप्त केली आहेत. या सिम कार्डांमधून राणाच्या संपर्कांचे आणि कथित नेटवर्कचे महत्त्वपूर्ण पुरावे मिळण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
तपासात राणाचा बंगालमध्ये स्लीपर सेल उभारण्याच्या प्रयत्नांमध्ये सहभाग असल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान त्याने काठमांडूमध्ये काही एजंट्सना भेटल्यानंतर उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बांगावनमार्गे बांगलादेशात जाण्याची योजना असल्याचे सांगितल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. बांगलादेशातील यशोर येथे पावेल त्याला भेटणार होता. त्यानंतर त्याला नवीन मोबाईल देऊन नेपाळ आणि पाकिस्तानमधील संपर्क पुन्हा सुरू करण्याची योजना असल्याचा दावा तपासात करण्यात आला आहे. राणावर संवेदनशील माहिती पुरवून त्याबदल्यात पैसे उकळल्याचाही आरोप आहे. मात्र, अटकेच्या वेळी त्याच्याकडे केवळ ३५० रुपये आढळले. त्यामुळे त्याच्या कथित आर्थिक व्यवहारांचा तपासही करण्यात येत आहे.
अटकेनंतर राणाने आपली ओळख तापसिया परिसरातील रहिवासी वहाब आलम अशी सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सखोल चौकशी आणि तपासानंतर तो पाकिस्तानी नागरिक असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्याच्या कथित संपर्कांचे जाळे, संवेदनशील माहितीची देवाणघेवाण आणि भारतातील संभाव्य स्लीपर सेलशी संबंधित बाबींचा तपास सुरक्षा यंत्रणा करत आहेत.