मुंबई
kumar sanu बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक कुमार सानू यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित आपल्या आयुष्यातील दोन धक्कादायक प्रसंगांचा नुकताच खुलासा केला आहे. दाऊद इब्राहिम आणि अबू सालेम यांच्यासाठी आपण परफॉर्म केल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले. विशेष म्हणजे, दाऊदसाठी आपण कार्यक्रमाला जात असल्याची माहिती सुरुवातीला आपल्याला नव्हती. वर्तमानपत्रांमध्ये आपले फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य आपल्या लक्षात आले, असे कुमार सानू यांनी स्पष्ट केले.
‘द लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत कुमार सानू यांनी सांगितले की, एकदा एका व्यक्तीने त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली होती. मात्र, त्यांनी खंडणी देण्यास नकार दिला. त्याऐवजी संबंधित व्यक्तीसाठी गाणे गाण्याची आणि परफॉर्म करण्याची तयारी त्यांनी दर्शवली. याच काळात ते गँगस्टर अबू सालेमच्या शोमध्ये गाणे गाण्यासाठी दुबईला गेले होते.कुमार सानू दुबईला जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी फोन करून अबू सालेमच्या शोमध्ये परफॉर्म करण्यासाठी जात आहात का, अशी विचारणा केली. त्यावर कुमार सानू यांनी होकार दिला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना त्या कार्यक्रमाला जाऊ नका, असा स्पष्ट इशारा दिला. एवढेच नव्हे, तर कार्यक्रमाला गेल्यास अटक करण्याचीही धमकी दिल्याचे कुमार सानू यांनी सांगितले.
मात्र, कुमार सानू यांनी पोलिसांसमोर आपली वेगळी भूमिका मांडली. जर आपण कार्यक्रमाला जाऊ नये असे पोलिसांना वाटत असेल, तर आपल्याला सुरक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. संबंधित व्यक्तीने आपल्यावर गोळीबार केला तर काय करायचे, असा सवालही त्यांनी पोलिसांना केला. “मी एक गायक आहे आणि गाणं हे माझं काम आहे,” असे सांगत त्यांनी आपली परिस्थिती पोलिसांसमोर स्पष्ट केली. एकतर सुरक्षा द्या किंवा काहीही होणार नाही, याची हमी द्या, अशी मागणी त्यांनी केली होती.पोलिसांच्या इशाऱ्यानंतरही कुमार सानू दुबईला गेले. त्यांनी अबू सालेमच्या कार्यक्रमात परफॉर्म केले आणि त्यानंतर हॉटेलवर परतले. तेथून सामान घेऊन सुखरूप भारतात परतल्याचे त्यांनी मुलाखतीत सांगितले.
दाऊद इब्राहिमशी संबंधित प्रसंगाबाबतही कुमार सानू यांनी महत्त्वाचा खुलासा केला. आपण दाऊदसाठी परफॉर्म करण्यासाठी जात आहोत, याची सुरुवातीला त्यांना कल्पनाच नव्हती. मात्र, कार्यक्रमानंतर वर्तमानपत्रांमध्ये आपले फोटो छापून आल्यानंतर आपण नेमक्या कोणासाठी परफॉर्म केला होता, याची जाणीव त्यांना झाली आणि परिस्थितीचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आले. कुमार सानू यांच्या या खुलाशामुळे त्यांच्या कारकिर्दीतील अंडरवर्ल्डशी संबंधित हा अनोखा आणि धक्कादायक अध्याय पुन्हा चर्चेत आला आहे.