सिंदेवाही वनपरिक्षेत्रात बिबट्याचा मृत्यू

    दिनांक :13-Aug-2026
Total Views |
नवरगाव,
leopard dies in sindewahi forest range सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत नवरगाव नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक 234/576 आरएफमध्ये गुरुवार, 13 ऑगस्ट रोजी मादी बिबट मृतावस्थेत आढळून आला. प्राथमिक अंदाजानुसार, या मादी बिबट्याचा मृत्यू दोन वन्यप्राण्यांच्या झुंजीत झाल्याचे सांगण्यात आले आहे.
 
 
leopard dies in sindewahi forest range
 
याबाब कळताच वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार-बोरावार वनकर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाल्या. घटनास्थळावर अंदाजे 2 वर्ष वयाच्या बिबट्या (मादी) मृतावस्थेत आढळून आला. त्यांनी घटनेची माहिती भ्रमणध्वनीव्दारे वरिष्ठ अधिकार्‍यांना दिली. त्यानंतर घटनास्थळावर ब्रम्हपुरी वनविभागचे उप वनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी एस. आर., सहायक वनसंरक्षक (प्रादेशिक व वन्यजीव) अरविंद जे., चंद्रपूरचे मानद वन्यजीव रक्षक अमोद गौरकार, तरुण पर्यावरणवादी मंडळ शंकरपूरचे शितलकुमार भांडारकर, स्वॉब नेचर फाउंडेशनचे जिवेश सयाम, बायोलॉजीस्ट राकेश अहुजा आदी उपस्थित झाले. त्यांच्या समक्ष घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला.
 
 
त्यानंतर मृत बिबट्यालाविच्छेदनासाठी सिंदेवाही येथील शव मध्यवर्ती काष्ठ भांडार येथे आणण्यात आले. तेथे वासेराचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद जांभुळे यांच्या उपस्थितीत मृत बिबट्याची तपासणी करण्यात आली. तपासणीअंती या बिबट्याचे सर्व अवयव शाबूत असल्याची खात्री करण्यात आली. त्यानंतर डॉ. विनोद जांभुळे यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदनानंतर पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या प्राथमिक निष्कर्षानुसार, या बिबट्याचा मृत्यू दोन वन्यप्राण्यांचे झुंजीत झाल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी वनगुन्हा नोंदविण्यात आला आहे. उपस्थित अधिकारी, वनकर्मचारी व पंच यांच्या समक्ष मध्यवर्ती काष्ठ भांडार येथे मृत बिबट्याचे सर्व अवयव नियमानुसार पूर्णपणे जाळून नष्ट करण्यात आले असून, त्याबाबतचा दहन पंचनामा नोंदविण्यात आलेला आहे.