बोर प्रकल्पात आढळला ल्यूसिस्टिक लालपंखी चंडोल

भारतातील पहिलीच नोंद

    दिनांक :13-Aug-2026
Total Views |
वर्धा,
leucistic red winged chandol निसर्ग आणि वन्यप्राणी व पक्ष्यांची आवड असलेले वन्यजीव अभ्यासक तथा वनसंशोधन केंद्रातील वनरक्षक मनेशकुमार सज्जन यांनी बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात येणार्‍या कारंजा तालुयातील येणीदोडका परिसरात ल्यूसिस्टिक लालपंखी चंडोल (इंडियन बूश लार्क) या पक्ष्याला कॅमेर्‍यात टिपले. विशेष म्हणजे, ल्युसिस्टिक इंडियन बूश लार्कची ही देशातील पहिलीच नोंद असून यामुळे भारतीय पक्षीशास्त्रात एका नवीन रंगबदलाच्या नोंदीची भर पडली आहे.
 
 
leucistic red winged chandol
 
निरीक्षणात या पक्ष्याच्या डोके, कपाळ, चेहरा, घसा, मान, छाती, खांद्याचा काही भाग व पाठीवरील पिसे पांढर्‍या रंगाची दिसून आली. तर पंख, शेपूट आणि शरीराच्या इतर भागांवर मूळ तपकिरी रंग व रेषा कायम होत्या. विशेष म्हणजे, या पक्ष्याचे पाय पूर्णपणे फिकट गुलाबी रंगाची, तर चोचही अंशत: गुलाबी रंगाची दिसून आली. मात्र, डोळे गडद रंगाचे असल्यामुळे हा पक्षी पूर्ण अ‍ॅल्बिनो नसून ल्यूसिस्टिक असल्याचे स्पष्ट झाले.
 
 
ल्यूसिझम हा शरीरातील मेलेनिन रंगद्रव्याच्या वितरणातील आनुवंशिक बदलामुळे निर्माण होणारा अत्यंत दुर्मिळ प्रकार आहे. अशा अवस्थेत पक्ष्यांच्या शरीरावरील काही पिसांमध्ये किंवा संपूर्ण शरीरावर रंगद्रव्य कमी होते किंवा नसते, पाय व चोंच गुलाबी रंगाची होते. परंतु, डोळ्यांचा रंग सामान्य राहतो. त्यामुळे अशा नोंदी पक्ष्यांच्या आनुवंशिक विविधता, उत्क्रांती आणि पर्यावरणीय परिणामांच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात.
 
 
हा पक्षी प्रथमदर्शनीच वेगळा असल्याचे जाणवले. त्यानंतर त्याचे निरीक्षण करून छायाचित्रे, व्हिडिओ व ध्वनिमुद्रण केले. डोळ्यांचा रंग सामान्य असून शरीरावरील पांढर्‍या पिसांमुळे हा पक्षी ल्यूसिस्टिक असल्याचे स्पष्ट झाले. सदर ल्युसिझम बाबत भारतातील ज्येष्ठ पक्षी अभ्यासक राजू कसंबे यांच्याकडून पुष्टी केली. भारतात इंडियन बुशलार्कमधील अशा प्रकारची ही पहिली नोंद असल्याचा आमचा प्राथमिक निष्कर्ष आहे. याबाबतचा शास्त्रीय संशोधन लेख प्रकाशित करण्याचा आपला मानस आहे, अशी प्रतिक्रीया वन्यजीव अभ्यासक तथा वनसंशोधन केंद्राचे वनरक्षक मनेशकुमार सज्जन यांनी दिली.
 
 
ल्यूसिझम हा आनुवंशिक म्युटेशनमुळे निर्माण होणारा दुर्मिळ रंगबदल आहे. या अवस्थेत पक्ष्यांच्या शरीरावरील काही पिसांमध्ये मेलेनिन नसल्यामुळे ती पांढरी, फिकट पांढरी किंवा तपकिरी दिसतात, तर डोळे सामान्य रंगाचे राहतात. अशा पक्ष्यांमध्ये चोच व पायांच्याही रंगात काही प्रमाणात बदल दिसून येऊ शकतो. चोंच व पायांचा रंग गुलाबी दिसतो. अनेकदा अशा दुर्मिळ रंगबदलाच्या किंवा असामान्य पक्ष्यांच्या नोंदी अनुभवी निरीक्षकांमुळेच समोर येतात. प्रत्येक निरीक्षणाची अचूक तारीख, ठिकाण, छायाचित्रे, ध्वनी आणि वर्तनाची नोंद ठेवली तर भविष्यातील संशोधनासाठी ती अमूल्य ठरते, अशी प्रतिक्रीया ज्येष्ठ पक्षी अभ्यासक राजू कसंबे यांनी दिली.