गदारोळात लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब!

अखेरच्या दिवशी अमित शाह सभागृहात

    दिनांक :13-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Lok Sabha proceedings adjourned संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवसही विरोधकांच्या घोषणाबाजी आणि गोंधळातच पार पडला. लोकसभेचे कामकाज गुरुवारी सकाळी सुमारे ११ वाजता अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. नियोजित वेळेनुसार अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. मात्र, सभागृहातील वातावरण पाहता कामकाज लवकरच स्थगित करण्यात आले.अधिवेशनाच्या अंतिम दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोघेही लोकसभेत उपस्थित राहिले. २० जुलैनंतर अमित शाह प्रथमच सभागृहात दिसल्याने त्यांच्या उपस्थितीकडे विशेष लक्ष वेधले गेले.
 
 
Lok Sabha proceedings adjourned
 
 
कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांच्या खासदारांनी विविध मुद्द्यांवरून घोषणाबाजी सुरू केली. काही काळानंतर ‘वंदे मातरम्’चे पठण झाले आणि वातावरणात थोडी शांतता निर्माण झाली. मात्र, त्यानंतर पुन्हा गोंधळ सुरू झाला आणि सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.या संपूर्ण अधिवेशनात विरोधकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवेदनाची मागणी सातत्याने लावून धरली. दिल्लीतील लाठीचार्जच्या मुद्द्यावर सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. याशिवाय राम मंदिराशी संबंधित मुद्द्यावरही संसदेत चर्चा व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षांनीकेली होती. यावेळी विरोधकांकडून "देणग्या कोणी लुटल्या?" आणि "अमित शाह, सभागृहात या" अशा घोषणा देण्यात आल्या. अधिवेशन संपण्याच्या काही दिवस आधी सरकारने विरोधकांच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची तयारी दर्शवली होती. विरोधी पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल, असे सरकारकडून सांगण्यात आले. त्यानंतर बुधवारी अमित शाह यांनीही आपण विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी तयार असल्याचे स्पष्ट केले.
 
 
 
 
अमित शाह यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना पत्र लिहून सभागृहाचे कामकाज पूर्ण होईपर्यंत थांबण्याची विनंती केली होती. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याची तयारी असल्याचे त्यांनी पत्रातून नमूद केले. विरोधकांना मात्र सरकारला चर्चा करायची नसल्याचा आरोप कायम ठेवला. दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी एनडीएच्या खासदारांनी झारखंडमधील लाठीचार्जचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून उत्तर मागितले. "राहुल गांधी, उत्तर द्या!" अशा घोषणा सत्ताधारी खासदारांकडून देण्यात आल्या.अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशीही सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे खासदार आमनेसामने आले आणि घोषणाबाजी झाली. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी सत्ताधारी पक्षाच्या खासदारांकडून आंदोलन आणि घोषणाबाजी होत असल्यावर भाष्य करत, सत्ताधारी पक्षाचे नेते आंदोलन करत असल्याची ही पहिलीच वेळ असल्याचे म्हटले. दरम्यान, लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब झाल्यानंतर काँग्रेस आणि इतर इंडिया आघाडीतील पक्षांनी संसद भवनातील लोकसभा अध्यक्षांच्या चहापान कार्यक्रमालाही उपस्थित राहणे टाळले. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाचा शेवटही सत्ताधारी आणि विरोधकांमधील तणावाच्या वातावरणात झाला.