पिंपरी,
suicide-case : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोमध्ये ८ जुलै रोजी झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या एका व्यक्तीच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
महिनाभरापूर्वीच मोशी येथील कचरा डेपोत लेगसी वेस्टचा डोंगर कोसळून झालेल्या दुर्घटनेत नागेश गायकवाड (वय २६) यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता त्यांच्या पत्नी सोनाली गायकवाड (वय २३) यांनी बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास मोशीतील संजय गांधीनगर वसाहतीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गायकवाड यांना लहान दोन मुली आहेत. या घटनेमुळे महिभरातच गायकवाड कुटुंबीयांवर पुन्हा एकदा मोठा आघात झाला असून महिनाभरातच या चिमुकल्या मुलींच्या डोक्यावरील आई वडीलांचे छत्र हरपले आहे. या घटनेमुळे शहरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सोनाली या संजय गांधी नगर येथील आपल्या लहान घरात आपल्या मुलींसह राहत होत्या. बुधवारी सायंकाळी एकट्याच घरी होत्या. सातच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांची मोठी मुलगी बराच वेळ दरवाजा वाजवत होती. पण, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यावेळी शेजारीच राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी दरवाजा तोडला. त्यावेळी त्या लटकलेल्या अवस्थेतत दिसल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे घोषित केले. अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त सुधाकर यादव यांनी दिली. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील चौकशी करून कारवाई केली जाईल अशी माहिती यादव यांनी दिली. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून शवविच्छेदनाचा रिपोर्ट आल्यानंतर पुढील चौकशी करूनच गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली.