माझ्या बॅगेत बॉम्ब आहे...

मुंबई एअरपोर्टवर ऐन गर्दीच्यावेळी खळबळ

    दिनांक :13-Aug-2026
Total Views |
मुंबई
mumbai airport bomb scare  छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टी-२ टर्मिनलवर ‘बॅगेत बॉम्ब आहे’ असे सांगत एका प्रवाशाने सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडवून दिली. दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाच्या बोर्डिंग गेटवर सुरक्षा तपासणीदरम्यान प्रवाशाने हे वक्तव्य केल्याने विमानतळावरील सुरक्षा यंत्रणा तातडीने सतर्क झाली. उड्डाणापूर्वीच संबंधित प्रवाशाला विमानातून उतरवून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) ताब्यात घेतले. दरम्यान, विमानातील इतर प्रवाशांनाही सुरक्षा प्रोटोकॉलनुसार खाली उतरवण्यात आले.
 

mumbai airport bomb scare  
मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोचे विमान मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी तयार होते. एअरसाइड बोर्डिंग गेटवर एअरलाइनचे असिस्टंट सिक्युरिटी मॅनेजर ओमप्रकाश राजभर आणि सुरक्षा अधिकारी रवींद्र रोकडे हे प्रवाशांच्या हँडबॅगची नियमित तपासणी करत होते. यावेळी प्रवाशांना त्यांच्या बॅगेत माचिस, लायटर, कात्री, द्रव पदार्थ किंवा इतर प्रतिबंधित वस्तू आहेत का, अशी नियमित विचारणा करण्यात येत होती.
याचवेळी ५५ वर्षीय अनुज जयराम सुवर्णा याला त्याच्या बॅगेबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर त्याने आपल्या बॅगेत बॉम्ब असल्याचे सांगितले. ‘बॉम्ब’ हा शब्द ऐकताच विमानतळावरील सुरक्षा यंत्रणा तातडीने सक्रिय झाली. एअरलाइन कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह CISFला या प्रकाराची माहिती दिली.त्यानंतर CISF जवानांनी तातडीने कारवाई करत अनुज सुवर्णा याला विमानातून खाली उतरवून ताब्यात घेतले. सुरक्षा नियमांनुसार विमानातील इतर सर्व प्रवाशांनाही खाली उतरवण्यात आले. त्यानंतर CISF आणि बॉम्ब शोधक पथकाने विमान, कार्गो तसेच प्रवाशांच्या सामानाची सखोल तपासणी केली. मात्र, या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा बॉम्ब आढळून आला नाही.संपूर्ण सुरक्षा तपासणी पूर्ण झाल्यानंतर विमानाला दिल्लीच्या दिशेने रवाना करण्यात आले. मात्र, या घटनेमुळे विमानतळावरील सुरक्षा यंत्रणेला मोठी धावपळ करावी लागली. विमानाची तपासणी, प्रवाशांना खाली उतरवणे आणि त्यानंतरची सुरक्षा प्रक्रिया यामुळे विमानाच्या उड्डाणालाही विलंब झाला.
दरम्यान, CISFने अनुज सुवर्णा याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी सहार पोलिसांच्या ताब्यात दिले. सुरक्षा अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. चौकशीदरम्यान आपण हे वक्तव्य केवळ गंमत म्हणून केले होते, असा दावा त्याने केल्याची माहिती आहे. त्यानंतर त्याला इशारा देऊन सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
मात्र, प्रवाशाने केलेल्या या एका वक्तव्यामुळे विमानतळावरील सुरक्षा यंत्रणेला मोठी कारवाई करावी लागली. विमानाची कसून तपासणी आणि प्रवाशांची सुरक्षा प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच विमान रवाना करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सहार पोलिसांकडून सुरू आहे.