बदली झाली पण अद्यापही मोह सुटेना ?

- वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज

    दिनांक :13-Aug-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर, 
city-police-force-transfer : शहर पोलिस दलात काही दिवसांपूर्वीच सर्वसामान्य बदल्यांची यादी जाहीर झाली. त्यानुसार जवळपास ९५ टक्के कर्मचारी जुन्या ठिकाणावरुन कार्यमुक्त होऊन बदलीच्या ठिकाणी रुजू झाले. मात्र, अजुनही काही कर्मचारी बदली झाल्यानंतरही पूर्वीच्याच ठिकाणी काम करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
 
 
 
NGP
 
 
 
नवनियुक्त पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पोलिस प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यांनी रात्रीची रस्त्यावरील अनावश्यक गर्दी आणि पानठेले बंद करुन गुन्हेगारांच्या अड्डयांवर प्रहार केला आहे. तसेच शहरातील दारु विक्री, ढाब्यातील मद्यविक्री, गांजा विक्री, ड्रग्ज, जुगार आणि अन्य अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, पोलिस आयुक्तांच्या या आदेशाचे काही ठाणेदार पालन करताना दिसत नाहीत. तसेच प्रत्येक पोलिस ठाण्यात अवैध धंद्यावाल्यांकडून ‘वसुली’ करण्यासाठी विशेष व्यक्ती ठेवण्यात येत होता. याची माहितीसुद्धा पोलिस आयुक्तांपर्यंत पोहचली आहे. नियमांचे तंतोतंत पालन व्हावे यासाठी पोलिस आयुक्तांनी ‘ऑन एअर’ पोलिस निरीक्षकांचे कान टोचले आहेत. यापूर्वी बऱ्याच पोलिस कर्मचाऱ्यांनी ‘सेटींग’ करुन स्वत:च्या बदल्या हव्या त्या ठिकाणी करुन घेतल्या होत्या. मात्र, त्यांचा उद्देश फक्त ‘वसुली’ असल्याची चर्चा आहे.
 
 
 
गेल्या काही दिवसांपूर्वी पोलिस आयुक्तांनी कालावधी पूर्ण झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची यादी जाहीर केली होती. त्यानुसार जवळपास ९५ टक्के पोलिस कर्मचाऱ्यांनी बदली झालेल्या ठिकाणी रुजू झाले आहेत. मात्र, गुन्हे शाखेसह पोलिस ठाण्यातील अजुनही काही पोलिस कर्मचारी बदली झाल्यानंतरही त्याच ठिकाणी कार्यरत आहेत. वरिष्ठांची अशा कर्मचाऱ्यांवर मर्जी असल्याचे बोलले जाते. बदली होऊनही त्याच ठिकाणी काम करणारे कर्मचारी ‘अर्थपूर्ण’ संबंध जोपासत असल्यामुळेच अजूनही बदली झालेल्या ठिकाणी रुजू होत नसल्याची चर्चा आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त दीपक अग्रवाल यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही, हे विशेष.