नवी दिल्ली,
ticket booking भारतीय रेल्वेच्या डिजिटल सेवांना प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, आयआरसीटीसीच्या ‘रेलवन’ या एकात्मिक ॲपने नवा टप्पा गाठला आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये सुरू करण्यात आलेल्या या ॲपचे आतापर्यंत ४.७६ कोटींपेक्षा अधिक डाउनलोड झाले आहेत. विशेष म्हणजे, या माध्यमातून दररोज सुमारे १० लाख ऑनलाइन रेल्वे तिकिटांचे बुकिंग केले जात आहे.रेल्वे मंत्रालयाने १२ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या अधिकृत माहितीनुसार, २ ऑगस्ट २०२६ पर्यंत ‘रेलवन’द्वारे दररोज १० लाख तिकिटे बुक केली जात होती. यामध्ये २ लाख ९० हजार आरक्षित, तर ७ लाख २४ हजार अनारक्षित तिकिटांचा समावेश आहे. त्यामुळे रेल्वेच्या तिकीट व्यवस्थेत या ॲपचा वापर झपाट्याने वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘रेलवन’ची खासियत म्हणजे रेल्वेशी संबंधित अनेक सुविधा एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आरक्षित तिकीट, यूटीएसच्या माध्यमातून अनारक्षित तिकीट आणि प्लॅटफॉर्म तिकीट बुक करण्याची सुविधा या ॲपमध्ये आहे. याशिवाय प्रवाशांना पीएनआरची स्थिती तपासणे, ट्रेनचे लाइव्ह स्टेटस पाहणे, रेल्वे मदत मागणे आणि प्रवासादरम्यान जेवणाची ऑर्डर देणे यांसारख्या सुविधा मिळतात.ॲपमध्ये सिंगल-साइन-ऑनची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वेच्या विविध सेवांसाठी प्रवाशांना वेगवेगळे ॲप वापरण्याची गरज कमी झाली आहे. रेल वॉलेट जोडण्याची सुविधाही उपलब्ध असून, त्यामुळे तिकीट बुकिंगची प्रक्रिया अधिक वेगवान करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
भारतीय रेल्वेच्या आकडेवारीनुसार, गेल्या काही वर्षांत ऑनलाइन आरक्षित तिकीट बुकिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. २०१३-१४ मध्ये केवळ ४९ टक्के आरक्षित तिकिटे ऑनलाइन बुक केली जात होती. आता हे प्रमाण सुमारे ८९ टक्क्यांवर पोहोचले आहे. अनारक्षित तिकिटांच्या बाबतीतही प्रवाशांचा डिजिटल पर्यायांकडे कल वाढला असून, सध्या ३९ टक्के अनारक्षित तिकिटे ॲपच्या माध्यमातून बुक केली जात आहेत.दरम्यान, रेल्वे तिकीट बुकिंगची प्रक्रिया आणखी सुलभ करण्यासाठी आयआरसीटीसीच्या नव्या संकेतस्थळाची बीटा आवृत्ती गेल्या महिन्यात सुरू करण्यात आली आहे. या संकेतस्थळाच्या वापरकर्ता इंटरफेसमध्ये मोठे बदल करण्यात आले असून, अंतिम आणि स्थिर आवृत्ती लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. एकाच वेळी मोठ्या संख्येने प्रवाशांना तिकीट बुक करता यावे, यासाठी रेल्वे आपल्या डिजिटल पायाभूत सुविधांची क्षमता आणि बँडविड्थ वाढवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे भविष्यात तिकीट बुकिंगच्या वेळी होणारी गर्दी आणि तांत्रिक अडचणी कमी करण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे.