नवी दिल्ली,
pilots drug tests एअर इंडियाने आपल्या समूहातील सर्व वैमानिकांची प्रतिबंधित पदार्थ आणि ड्रग्जसाठी अनिवार्य तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. AI2379 या विमानाशी संबंधित घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला असून, प्रवाशांची सुरक्षितता आणि एअर इंडियावरील विश्वास कायम ठेवण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलल्याचे सांगितले आहे.एअर इंडियाच्या माहितीनुसार, वैमानिकांची तपासणी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तसेच उड्डाणांनंतरही केली जाणार आहे. गुरुग्राममधील अकादमी, फ्लाइट ब्रीफिंग सेंटर आणि विविध बेस ठिकाणी या चाचण्या घेण्यात येतील. कंपनीने स्पष्ट केले आहे की, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या म्हणजेच डीजीसीएच्या नियमांचे ती आधीपासून पालन करत आहे. हे नियम युरोप आणि अमेरिकेतील प्रचलित मानकांशी सुसंगत असल्याचेही एअर इंडियाने म्हटले आहे.
एअर इंडियाने सांगितले की, डीजीसीएच्या विद्यमान नियमांचे पालन सुरू असतानाही आता सर्व वैमानिकांची तपासणी करण्याचा अतिरिक्त निर्णय घेण्यात आला आहे. विमान वाहतुकीतील सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे आणि प्रवाशांचा विश्वास कायम राखणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.४ ऑगस्ट रोजी दिल्ली-फुकेट फ्लाइट AI2379 ला प्रवासादरम्यान तीव्र टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, फुकेटहून दिल्लीला परतताना विमान अचानक सुमारे ३०० फूट खाली आले. या घटनेनंतर वैमानिक कॉकपिटच्या जमिनीवर पडलेल्या अवस्थेत आढळल्याचे सांगण्यात आले. या प्रकारात १५ हून अधिक जण जखमी झाले.
या घटनेची चौकशी विमान अपघात तपासणी ब्युरो अर्थात एएआयबीकडून सुरू आहे. एका क्रू सदस्याने केलेल्या तक्रारीत वैमानिकाने गांजाचे सेवन केल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय बसण्याच्या नियमावरून वैमानिक आणि केबिन क्रू सदस्यामध्ये वाद झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. फुकेत येथे विमान पोहोचल्यानंतरही दोघांमधील तणाव कायम असल्याचे सांगण्यात आले.pilots drug tests या घटनेच्या पार्श्वभूमीवर ११ ऑगस्ट रोजी एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन यांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह नागरी हवाई वाहतूक सचिव समीर कुमार सिन्हा आणि इतर अधिकाऱ्यांची भेट घेतली. AI2379 विमानातील घटनेनंतर नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने एअर इंडियाच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावल्याचे सूत्रांनी सांगितले. नव्या निर्णयामुळे एअर इंडियाच्या वैमानिकांच्या तपासणीची व्याप्ती वाढणार असून, प्रतिबंधित पदार्थांच्या वापराबाबत कोणतीही शंका राहू नये आणि विमान प्रवासातील सुरक्षेचे मानदंड अधिक मजबूत करता यावेत, यावर कंपनीने भर दिला आहे