वर्धा,
pankaj-bhoyar : दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्याकडील एकूण निधीच्या ५ टके निधी दिव्यांगांसाठी खर्च करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व स्थानिक संस्थांनी आपल्या क्षेत्रातील दिव्यांगांच्या कल्याणासाठी हा निधी खर्च करावा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दिव्यांगांसाठी राखीव निधीचा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आ. सुमित वानखेडे, जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी प्रतिभा भागवतकर तसेच दिव्यांग निधी जिल्हास्तरीय समितीचे अशासकीय सदस्य संजय जाधव, नरेंद्र नरोटे, भोजराज पाटील आदी उपस्थित होते.
दिव्यांग निधीतून योजना राबविताना त्यांना रोजगाराचे साधन कसे उपलब्ध होईल, अशा प्रकारच्या योजना राबविण्यात याव्या. अस्थिव्यंग दिव्यांगांकडून स्कुटीची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे नोंदणीकृत आणि अत्यंत आवश्यक असलेल्या सर्व पात्र दिव्यांगांना स्कुटी देता येईल का? याबाबत नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
सुरुवातीला प्रतिभा भागवतकर यांनी दिव्यांगांसाठी राबविण्यात येणार्या उपक्रमांची माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या ५ टके निधीतून पहिली ते दहावीच्या १३४ दिव्यांग विद्यार्थिनींना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे किसान विकास पत्र देण्यात आले. अस्थिव्यंग प्रवर्गातील १२ दिव्यांग लाभार्थ्यांना १० लाख ५५ हजार रुपये खर्च करून स्कुटी देण्यात आल्या. पंचायत समित्यांनी त्यांच्या ५ टके निधीतून ११ लाख ६३ हजार रुपये दिव्यांगांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबवून खर्च केले. त्यात दिव्यांग लाभार्थ्यांना पीठ गिरणीचे वाटप, दिव्यांग विद्यार्थ्यांना निर्वाहभत्त्याचा लाभ देण्यात आला. ग्रामपंचायतींनी १ कोटी ८४ लाख रुपये खर्च करून विविध उपक्रम राबविले. नगरपरिषदांनी विविध प्रकारच्या डीबीटी योजना राबविल्या. जिपच्या वतीने यावर्षी दिव्यांगांना धान्य साफ करण्याची मशिन पुरविणे, दिव्यांग बचतगटांसाठी विविध उपक्रम, तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा आयोजनाचे नियोजन असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.