८.३१० किलो गांजासह तस्कर ताब्यात

- स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ः ९.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

    दिनांक :13-Aug-2026
Total Views |
गोंदिया, 
smuggler-detained-with-cannabis : अवैधरीत्या विक्रीसाठी गांजा घेऊन जाणार्या तस्कराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा कारवाई करून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ८ किलो ३१० ग्रॅम गांजा, मोपेड दुचाकी, अँड्रॉइड मोबाईल व दोन स्कूल बॅग असा ९ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई आमगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत कुंभारटोली-जामखारी मार्गावर १२ ऑगस्ट रोजी करण्यात आली. प्रमोद जितेंद्र लक्षणे (२६) रा. झिलमिली, ता. जि. गोंदिया असे अटक करण्यात आलेल्या तस्कराचे नाव आहे.
 
 
JKL
 
 
पोलिस अधीक्षक गोरख भामरे व अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे व अंमली पदार्थांची विक्री करणार्यांविरुद्ध प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाद्वारे अवैध धंद्यांविरोधात पेट्रोलिंग सुरू असताना आरोपी प्रमोद लक्षणे हा गांजा घेऊन कुंभारटोली ते जामखारी मार्गावरून वाहतूक करणार असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कुंभारटोली-जामखारी मार्गावर सापळा कारवाई केली. दरम्यान, काही वेळाने पोलिसांना संशयित इसम पाठीवर स्कूल बॅग आणि पांढर्या रंगाच्या मोपेडवर आणखी एक स्कूल बॅग घेऊन जामखारीकडून कुंभारटोलीकडे येताना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पंचांसमक्ष दोन्ही बॅगची झडती घेतली. यावेळी बॅगमध्ये हिरवी, ओलसर पाने, फुले, बिया, शेंडे व बोंडे मिश्रित ८.३१० किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी सदर गांजा किमत ८ लाख ३१ हजार रुपये, दोन स्कूल बॅग १ हजार रुपये, अँड्रॉइड मोबाईल १० हजार रुपये आणि मोपेड १ लाख रुपये असा ९ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपी प्रमोद लक्षणे याच्याविरुद्ध आमगाव पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.