मुंबई
sonal productions मराठी रंगभूमीवर ‘गोष्ट तशी गंमतीची’, ‘परफेक्ट मिसमॅच’, ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’, ‘दादा एक गुड न्यूज आहे’ यांसारख्या दर्जेदार आणि आशयपूर्ण नाटकांची परंपरा जपणाऱ्या सोनल प्रॉडक्शन्सच्या दोन नाटकांनी सध्या नाट्यरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. ‘जर तर ची गोष्ट’ आणि ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ या दोन्ही नाटकांना महाराष्ट्रासह देश-परदेशातील रसिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असून, त्यांच्या यशाची घोडदौड कायम आहे. या यशस्वी वाटचालीत आणखी दोन महत्त्वाचे टप्पे लवकरच गाठले जाणार आहेत. ‘जर तर ची गोष्ट’चा ४०० वा प्रयोग १६ ऑगस्ट रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात सकाळी ११ वाजता, तर ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’चा ५० वा प्रयोग ३० ऑगस्ट रोजी विलेपार्ले येथील दिनानाथ नाट्यगृहात सायंकाळी ४ वाजता रंगणार आहे.
प्रिया बापट प्रस्तुत आणि नंदू कदम निर्मित ‘जर तर ची गोष्ट’ या नाटकाने आपल्या आगळ्या विषयासह कलाकारांच्या दमदार अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. अद्वैत दादरकर आणि रणजित पाटील यांच्या दिग्दर्शनाखाली, इरावती कर्णिक यांच्या लेखणीतून साकारलेल्या या नाटकाचे आतापर्यंतचे प्रयोग हाऊसफुल्ल ठरले आहेत. मुंबई-पुण्यासह महाराष्ट्राच्या विविध भागांत, तसेच महाराष्ट्राबाहेर आणि परदेशातही या नाटकाला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता ४०० व्या प्रयोगाकडे नाट्यरसिकांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे, प्रिया बापट प्रस्तुत आणि नंदू कदम निर्मित ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ या नाटकानेही रंगभूमीवर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. एका कुटुंबातील तीन वेगवेगळ्या पिढ्यांच्या जगण्यातील, विचारांतील आणि नात्यांतील गंमतीदार प्रवास उलगडणाऱ्या या नाटकाला महाराष्ट्रासह महाराष्ट्राबाहेरील रसिकांकडूनही भरभरून दाद मिळत आहे. ३० ऑगस्ट रोजी या नाटकाचा ५० वा प्रयोग रंगणार असून, हा टप्पाही विशेष ठरणार आहे. सोनल प्रॉडक्शन्स निर्मित या नाटकात सुनील बर्वे, हर्षदा खानविलकर, अक्षर कोठारी, शर्मिला राजाराम शिंदे, शंतनू ठवळी आणि वैष्णवी आंबवणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अमोल पाटील यांनी लेखन केले असून अद्वैत दादरकर यांनी दिग्दर्शन केले आहे.
विशेष म्हणजे, या दोन्ही sonal productions नाटकांच्या यशामागे नात्यांशी जोडलेला भावनिक धागा हा महत्त्वाचा घटक ठरला आहे. ‘जर तर ची गोष्ट’मधून तरुणाईच्या नात्यांमधील गुंतागुंत, प्रेम, अपेक्षा आणि बदलत्या भावविश्वाचा वेध घेतला आहे. तर ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’मध्ये तीन पिढ्यांमधील नाती, विचार आणि बदलती जीवनशैली यांवर हलक्याफुलक्या शैलीत भाष्य करण्यात आले आहे. हसवत-खेळवत नात्यांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या दोन्ही नाटकांनी मिळवलेले यश सोनल प्रॉडक्शन्सच्या रंगभूमीवरील दमदार वाटचालीचीच साक्ष देणारे ठरत आहे.