भरधाव कार दुभाजकावर आदळली ;दोघे गंभीर

    दिनांक :13-Aug-2026
Total Views |
मालेगाव,
speeding car crashes into divider two मालेगाव वाशीम मार्गावरील झोडगा गावाजवळ राष्ट्रीय महमार्ग क्रमांक १६१ वर गुरुवारी दुपारी १२ वाजता च्या दरम्यान भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकावर जोरदार आदळली. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले असून, अन्य दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे.
 
 
speeding car crashes into divider two
 
प्राप्त माहितीनुसार, एमपी १३ एएफ ८९२७ क्रमांकाची कार धार (मध्य प्रदेश) येथून हैदराबादकडे जात होती. झोडगा जवळील चिंतामणी हॉटेल परिसरात भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावर जोरदार आदळली. कारमध्ये शुभम ठाकूर वय २८ राहणार धार मध्यप्रदेश, कन्हैया ठाकूर वय २३, शुभम पाटीदार वय ४० आणि नारायण पाटीदार वय ४० तिघेही राहणार इंदौर मध्यप्रदेश हे चौघे प्रवास करत होते. या अपघातात शुभम ठाकूर आणि नारायण पाटीदार हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा पथक अमानीचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश सरनाईक, हेकॉ महेंद्र जाधव, पोकॉ सचिन जाधव व विष्णू उगले तसेच मालेगाव पोलिस ठाण्यातील डायल ११२ वर तैनात पोकॉ निरंजन गुंडजवार आणि चालक पोकॉ पवन भालेराव घटनास्थळी दाखल झाले.
 
 
पोलिसांनी गंभीर जखमी शुभम ठाकूर व नारायण पाटीदार यांना तातडीने खाजगी वाहनातून मालेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी अपघातग्रस्त कार रस्त्याच्या बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली तसेच घटनास्थळी आवश्यक बॅरिकेडिंग केले. प्राथमिक माहितीनुसार, भरधाव वेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या प्रकरणी मालेगांव पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे.