लेहमध्ये भूकंपांचे जोरदार धक्के

    दिनांक :13-Aug-2026
Total Views |
लेह,
Strong earthquake tremors in Leh लडाखमधील लेह शहराला गुरुवारी सकाळी काही तासांच्या अंतराने भूकंपाचे दोन जोरदार धक्के बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार, पहिल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.५ होती, तर दुसऱ्या भूकंपाची तीव्रता ४.३ इतकी नोंदवण्यात आली. दोन्ही भूकंपांची खोली १० किलोमीटर होती.१३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी पहिला भूकंप झाला. ५.५ तीव्रतेच्या या धक्क्याने लेह परिसर अक्षरशः हादरला. भूकंपाची तीव्रता जाणवताच अनेक नागरिक घराबाहेर पडून सुरक्षित ठिकाणी गेले. पहाटेच्या वेळी अनेक जण झोपेत असताना अचानक घराला हादरे जाणवल्याने नागरिकांची झोप उडाली.
 

leh 
 
 
यानंतर सकाळी ९ वाजून ५४ मिनिटांनी ४.३ तीव्रतेचा दुसरा भूकंप झाला. अवघ्या काही तासांत दोनदा जमीन हादरल्याने नागरिकांमध्ये अधिकच चिंता निर्माण झाली. भूकंपाचे धक्के पुन्हा जाणवण्याची शक्यता असल्याने काही नागरिक खबरदारी म्हणून घराबाहेरच थांबले.दरम्यान, या दोन्ही भूकंपांमुळे आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, अचानक आलेल्या जोरदार धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली.
 
 
गिलगिट-बाल्टिस्तान परिसरातही एकापाठोपाठ दोन उथळ भूकंपाचे धक्के नोंदवण्यात आले असून, त्याचे परिणाम काश्मीर आणि लडाखमधील काही भागांमध्ये जाणवल्याचे सांगण्यात आले आहे. हिमालयीन पट्टा भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील असल्याने अशा घटनांकडे गांभीर्याने पाहिले जाते.भूकंपाची तीव्रता वाढत गेल्यानंतर त्याचा संभाव्य धोका देखील वाढतो. २.० किंवा त्यापेक्षा कमी तीव्रतेचे भूकंप सामान्यतः अत्यंत सौम्य असतात आणि अनेकदा ते जाणवतही नाहीत. मात्र, ४.५ किंवा त्याहून अधिक तीव्रतेचे भूकंप स्पष्टपणे जाणवू शकतात आणि परिस्थितीनुसार इमारती व मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता असते. ७.० किंवा त्याहून अधिक तीव्रतेचे भूकंप मोठ्या प्रमाणावर विध्वंस घडवू शकतात.