मांसाहारी असाल तर घर नाही मिळणार

ताडदेवमधील फ्लॅटच्या जाहिरातीने वाद पेटला

    दिनांक :13-Aug-2026
Total Views |
मुंबई
taddev flat controversy मुंबईतील मराठीबहुल मानल्या जाणाऱ्या ताडदेव परिसरात मांसाहार करणाऱ्यांना घर देण्यास नकार देणारी जाहिरात समोर आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेला ब्रोकर भावेश कावरे याने इन्स्टाग्रामवरील रीलद्वारे ताडदेवमधील एका इमारतीतील 2 BHK फ्लॅटची जाहिरात केली होती. या जाहिरातीत 900 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया असलेले हे घर केवळ ‘प्युअर शाकाहारी’ व्यक्तींनाच दिले जाईल आणि मांसाहार करणाऱ्यांना घर मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर नागरिक तसेच विविध राजकीय संघटनांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
 

taddev flat controversy ‘non-vegetarians won’t get a house’ ad sparks row in mumbai 
या प्रकारावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाल्या आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी, ‘ब्रोकरही आता बिल्डरांचीच भाषा बोलू लागले आहेत,’ अशी टीका केली. संबंधित ब्रोकरचा शोध घेऊन त्याचा योग्य तो समाचार घेतला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनीदेखील या प्रकाराचा निषेध केला आहे. मराठी माणसाचा असा अपमान सहन केला जाणार नाही, असे सांगत या प्रकरणाला ‘मनसे स्टाईल’ने उत्तर दिले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
या प्रकरणावर शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनीही आक्रमक प्रतिक्रिया दिली. केवळ संताप व्यक्त करून उपयोग नाही, तर आता प्रत्यक्ष कारवाई करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. 
मुंबईतील काही भागांत taddev flat controversy  यापूर्वीही मराठी नागरिकांना किंवा मांसाहार करणाऱ्या कुटुंबांना घर नाकारल्याच्या घटना समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. घाटकोपर, मुलुंड, चांदिवली आणि गिरगाव यांसारख्या परिसरांत अशा घटना चर्चेत आल्या होत्या. आता मराठीबहुल मानल्या जाणाऱ्या ताडदेवमध्येच अशा प्रकारची अट असलेली जाहिरात समोर आल्याने मराठी संघटनांमध्येही नाराजी वाढली आहे. त्यामुळे सोशल मीडिया ब्रोकर भावेश कावरे तसेच संबंधित इमारतीच्या बिल्डरविरोधातही टीका होत आहे.दरम्यान, या वादानंतर भावेश कावरे यांनी संबंधित वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावरून डिलीट केली आहे. मांसाहारी नागरिकांना फ्लॅट न देण्याच्या जाहिरातीवरून समाजमाध्यमांवर नाराजीच्या प्रतिक्रिया उमटत होत्या. विविध राजकीय पक्षांनीही या प्रकारावर आक्षेप घेतल्यानंतर संबंधित पोस्ट हटवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.