तभा वृत्तसेवा
राळेगाव,
service-road-in-vadki : राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या वडकी येथील सेवा रस्त्याच्या विकासाला आता गती मिळाली आहे. महामार्ग प्राधिकरण विभागाच्या वतीने सेवा रस्त्यालगत करण्यात आलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली होती. सिमेंट रस्ता कामासाठी मशीनच्या सहायाने जुना रस्ता फोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. लवकरच या ठिकाणी सिमेंट रस्ता होणार असल्याची माहिती महामार्ग प्राधिकरण अधिकाèयांनी दिली.
अतिक्रमण कारवाईबाबत महामार्ग प्राधिकरण अधिकाèयांकडे विचारणा केली असता, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमणे निर्धारित कालावधीत हटविण्याचे निर्देश असल्याने त्यानुसार वडकी येथेही कारवाई करण्यात आल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.
अतिक्रमण हटविण्यामागे केवळ न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणीच नव्हे, तर वडकी येथील सेवा रस्त्याच्या दुरुस्ती व विकासाचे कामही महत्त्वाचे कारण असल्याचे महामार्ग प्राधिकरण विभागाने स्पष्ट केले. पावसाळ्यात सेवा रस्त्यावर वारंवार मोठमोठे खड्डे पडतात. पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहनचालक व नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सेवा रस्त्यावर सिमेंट रस्ता करण्याचे नियोजन आहे.
सिमेंट रस्ता कामासाठी सेवा रस्ता पूर्णपणे मोकळा असणे आवश्यक असल्याने अतिक्रमणे हटविण्यात आली. अतिक्रमणांमुळे रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण होऊ नये आणि नियोजित काम सुरळीतपणे पूर्ण करता यावे, यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे अधिकाèयांनी सांगितले.
महामार्ग विभागाचे प्रकल्प व्यवस्थापक अमित राणा यांच्या मार्गदर्शनात महेश भडंगे यांच्या नेतृत्वात वडकी येथे अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. कारवाईनंतर सेवा रस्ता मोकळा करण्यात आला असून, आता सिमेंट रस्ता कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.
सध्या सेवा रस्त्यालगत मशीनच्या साहाय्याने जुना रस्ता फोडण्याचे काम सुरू आहे. रस्त्याची आवश्यक तयारी पूर्ण झाल्यानंतर लवकरच सिमेंट रस्ता तयार करण्याचे काम हाती घेतले जाणार असल्याचे महामार्ग प्राधिकरणने सांगितले.
अतिक्रमण कारवाईमुळे व्यवसायींमध्ये नाराजी असली तरी दुसरीकडे सेवा रस्ता पक्का झाल्यास पावसाळ्यातील खड्डे, चिखल आणि पाणी साचण्याची समस्या कमी होऊन वाहनचालक व नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे अतिक्रमण हटविल्यानंतर सुरू झालेल्या सिमेंट रस्ता कामाकडे आता वडकीकरांचे लक्ष लागले आहे.