वन्यप्राण्यांपासून सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाचा वापर करा

आ. मुनगंटीवार यांची वनमंत्री नाईक यांच्याकडे मागणी

    दिनांक :13-Aug-2026
Total Views |
25 रानहत्तींच्या कळपाच्या पृष्ठभूमीवर उपाययोजना
चंद्रपूर,
protection against wild animals सावली तालुक्यात सुमारे 25 रानहत्तींचा कळप दाखल झाल्याने तसेच परिसरात वाघ व इतर हिंस्त्र वन्यप्राण्यांचा वाढता वावर लक्षात घेता, नागरिक व शेतकर्‍यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे आणि त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली. रानहत्ती व हिंस्त्र वन्यप्राण्यांच्या हालचालींवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यासोबतच गस्त वाढविणे, आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून देणे आणि जीवितहानी झाल्यास तात्काळ नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही गतिमान करण्याची मागणीही आ. मुनगंटीवार यांनी केली.
 
 
protection against wild animals
 
मंत्रालयातील दालन क्रमांक 540 येथे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सावली तालुक्यातील रानहत्ती व हिंस्त्र वन्यप्राण्यांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा झाली. बैठकीस वनविभाग उपसचिव एन. सी. पांडे, प्रधान मुख्य वन संरक्षक तथा वनबल प्रमुख एम. श्रीनिवास राव, उपसचिव प्रवीण मुंडे, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक आर. एस. रामानुजन, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक प्रभुनाथ शुक्ला उपस्थित होते.
 
 
रानहत्ती व इतर वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी थर्मल ड्रोन, जीआयएस, अत्याधुनिक निरीक्षण व इशारा प्रणाली तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञानाचा वापर करण्याची मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली. वन्यप्राण्यांमुळे नागरिकांचा मृत्यू किंवा जीवितहानी झाल्यास संबंधित कुटुंबाला नुकसानभरपाईची रक्कम कोणताही विलंब न करता उपलब्ध करून देण्यासाठी प्रक्रिया अधिक गतिमान करण्याची मागणीही आ. मुनगंटीवार यांनी केली.
 
वनमंत्र्यांकडून तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश
आ. मुनगंटीवार यांच्या मागण्यांची दखल घेत, वनमंत्री गणेश नाईक यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित अधिकार्‍यांना तातडीने प्रतिबंधात्मक व संरक्षणात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. वन्यप्राण्यांच्या हालचालींवर नियमित देखरेख ठेवणे, संवेदनशील भागात गस्त वाढविणे, स्थानिक नागरिकांना आवश्यक सूचना देणे आणि मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपलब्ध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.