वंदे मातरम्

    दिनांक :13-Aug-2026
Total Views |
वेध...

संजय रामगिरवार
vande mataram स्वातंत्र्य दिनाच्या पृष्ठभूमीवर ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला ‘जन गण मन’ या राष्ट्रगीताइतकाच कायदेशीर दर्जा आणि सन्मान देणारा कायदा पारित झाला असून राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आता ‘वंदे मातरम्’चा अवमान करणे, ते गाण्यापासून राेखणे हा गुन्हा ठरणार असून त्यासाठी थेट तीन वर्षांपर्यंतच्या कारावासाची आणि दंडाची शिक्षा असणार आहे. ज्या राष्ट्रीय गीताने या देशाच्या स्वातंत्र्याची पायाभरणी केली, त्याचाच सन्मान टिकवण्यासाठी कायदा करावा लागणे, हेच मुळात वैचारिक प्रगल्भतेचे अपयश आहे.
 
vande mataram
 
‘वंदे मातरम्’चा इतिहास हा काेणत्याही राजकीय पक्षाचा किंवा विशिष्ट धर्माचा ‘अजेंडा’ नाही, तर ताे या देशाच्या अस्मितेचा आणि त्यागाचा जिवंत दस्तावेज आहे. ७ नाेव्हेंबर १८७५ राेजी बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी रचलेल्या आणि १८९६ च्या काेलकाता काँग्रेस अधिवेशनात गुरुदेव रवींद्रनाथ टागाेरांनी स्वरबद्ध केलेल्या या गीताने भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व ऊर्जा फुंकली हाेती. १९०५ च्या ‘बंग भंग’ आंदाेलनात ब्रिटिशांच्या लाठ्या आणि गाेळ्या छातीवर झेलताना ‘वंदे मातरम्’ हा क्रांतिकारकांचा सर्वांत माेठा मंत्र झाला हाेता. मादाम भिकाजी कामा यांनी १९०७ मध्ये परदेशात फडकवलेल्या पहिल्या भारतीय ध्वजावरही सुवर्णाक्षरांत ‘वंदे मातरम्’ काेरले हाेते. या शब्दांनी ब्रिटिश इतके घाबरायचे की, त्यांनी ‘वंदे मातरम्’ म्हणण्यावरच बंदी घातली. कारण हे शब्द संपूर्ण देशाला एक सूत्रात बांधणारे महामंत्र ठरले हाेते. २४ जानेवारी १९५० राेजी संविधान सभेचे अध्यक्ष डाॅ. राजेंद्र प्रसाद यांनी स्पष्ट केले हाेते की, ‘जन गण मन’ प्रमाणेच ‘वंदे मातरम्’चा सन्मान तितकाच तुल्यबळ असेल.
 
 
असे असतानाही, स्वातंत्र्याेत्तर काळात या गीताभाेवती राजकीय आणि धार्मिक मतभेदांचे ढग जमा झालेत. काही मुस्लिम संस्थांनी ‘ताैहीद’चा युक्तिवाद पुढे केला. काही इतिहासकार व विचारवंतांच्या मते, ‘आनंदमठ’ या कादंबरीतील संन्याशांचे बंड हे तत्कालीन मुस्लिम नवाेदितांच्या किंवा नबाब राजवटीविरुद्ध दाखवले हाेते म्हणून या कादंबरीतील ‘वंदे मातरम्’ला एका विशिष्ट ध्रुवीकरणाच्या चाैकटीतून पाहिले जाते. तर, काही पुराेगामी आणि नागरी हक्क कार्यकर्त्यांच्या मते, देशभक्ती ही मनातून आली पाहिजे. ती काेणत्याही विशिष्ट गीताच्या माध्यमातून सिद्ध करण्याची सक्ती हाेऊ नये.
 
खरे तर, स्वातंत्र्याच्या सात दशकानंतर या गीताभाेवती धार्मिक आणि राजकीय वाद निर्माण हाेणे, हेच संतापजनक आहे. या गीतातील पहिल्या दाेन कडव्यांमध्ये केवळ मातृभूमीच्या नैसर्गिक साैंदर्याची, तिच्या सुजलाम्-सुफलाम् रूपाची कृतज्ञतापूर्वक स्तुती आहे. तरीही, हे गीत आमच्या धार्मिक तत्त्वांच्या किंवा एकेश्वरवादाच्या विराेधात आहे, असा साेयीस्कर युक्तिवाद करणे, हे न पटण्यासारखे आहे. ज्या भूमीच्या अन्नावर आपण जगताे, ज्या मातीत आपण लहानाचे माेठे हाेताे, त्या मातृभूमीला वंदन करण्यात, तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात काेणत्याही धर्माचा अपमान कसा हाेऊ शकताे? राष्ट्रभक्ती ही काेणत्याही धर्माच्या चाैकटीत बंदिस्त असूच शकत नाही. धार्मिक कट्टरता आणि राजकीय स्वार्थापाेटी एका ऐतिहासिक राष्ट्रप्रेमाच्या प्रतीकाला अशा संकुचित वादात ओढणे दुर्दैवी आहे. पालिका सभा, विधिमंडळे आणि सार्वजनिक व्यासपीठांवरून ‘वंदे मातरम्’ सुरू असताना सभात्याग करणे, घाेषणाबाजी करणे किंवा जाणीवपूर्वक त्याचा अनादर करण्याचे प्रकार उद्विग्न करणारे आहेत. ज्या गीतासाठी हजाराे तरुण फासावर चढले, त्या गीताचा मान राखण्यासाठी आज देशाला दंडात्मक कायदा करावा लागत असेल, तर त्यास सामाजिक नैतिकतेच्या पराभवाचा पुरावा मानला पाहिजे.
 
 
कायदा झाल्यानंतरही दक्षिण भारतातील काही कंटक पुढारी आपला फणा वर काढतच आहेत. ‘‘माेदींनी आम्हाला जेलमध्ये टाकले, तरी आम्ही आधी जसे वंदे मातरम् म्हणत हाेताे, तसेच म्हणत राहू...’’ इतकी जाहीर मुजाेरी ते करीत आहेत. राष्ट्रीय प्रतीकांना वादाचे साधन बनवून स्वतःच्या राजकीय पाेळ्या भाजणाऱ्या अशा घटकांमुळेच ही निर्वाणीची वेळ आली आहे. ‘वंदे मातरम्’ला विराेध करणे म्हणजे केवळ एका गीताला विराेध करणे नव्हे, तर स्वातंत्र्यलढ्यात ज्यांचे रक्त सांडले त्या हजाराे हुतात्म्यांच्या बलिदानाचा अवमान करणे हाेय. हा विराेध तत्काळ थांबला पाहिजे. कायद्याच्या भीतीने नव्हे, तर अंतःकरणातील राष्ट्रप्रेमाच्या भावनेने प्रत्येक भारतीयाने ‘वंदे मातरम्’चा गाैरव केला पाहिजे. या देशाच्या एकात्मतेची हीच खरी कसाेटी ठरेल.
 
९८८१७१७८३२