वॉशिंग्टन,
Withdrawal of US troops from Iraq इराकमधील अमेरिकेच्या जवळपास २३ वर्षांच्या लष्करी उपस्थितीचा आता शेवट होणार आहे. इराकचे पंतप्रधान अली अल-जैदी यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत इराकमधील सर्व अमेरिकन सैन्य माघारी जाणार आहे. यूएस सेंट्रल कमांडचे प्रमुख ॲडमिरल ब्रॅड कूपर यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर या निर्णयाला दुजोरा देण्यात आला.अमेरिकेच्या इराकमधील लष्करी मोहिमेचा इतिहास २००३ पासून सुरू होतो. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन यांची राजवट उलथवून टाकण्यासाठी अमेरिका आणि नाटो देशांनी लष्करी कारवाई केली होती. सद्दाम हुसेन यांना अटक झाल्यानंतर त्यांच्यावर खटला चालवण्यात आला आणि त्यांना फाशी देण्यात आली. मात्र, त्यानंतरही अमेरिकन सैन्याची इराकमधील उपस्थिती कायम राहिली.
२०११ मध्ये अमेरिकेने इराकमधून सैन्य मागे घेतले होते. मात्र, २०१४ मध्ये इस्लामिक स्टेट अर्थात आयसिसचा धोका वाढल्यानंतर अमेरिकन सैन्य पुन्हा इराकमध्ये दाखल झाले. आयसिसविरोधातील कारवायांमध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आघाडीने महत्त्वाची भूमिका बजावली. आता या लष्करी मोहिमेची सांगता करून सैन्य माघारीचा अंतिम टप्पा सुरू करण्यात आला आहे.पंतप्रधान अली अल-जैदी यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, ३० सप्टेंबर ही अमेरिकन सैन्याच्या माघारीची अंतिम मुदत आहे. आयसिसविरोधातील अमेरिकेच्या नेतृत्वाखालील लष्करी मोहिमेची सांगता आणि त्यानंतर सैन्याची माघार या प्रक्रियेसाठी ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. १ ऑक्टोबरपासून इराकमध्ये कोणत्याही परकीय लष्करी उपस्थितीशिवाय नव्या पर्वाला सुरुवात होईल, असे निवेदनात म्हटले आहे. अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन सैन्याच्या माघारीच्या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रादेशिक संघर्ष अधिक तीव्र झाल्यास इराकच्या भूमीचा वापर इराणविरोधातील संभाव्य लष्करी कारवाईसाठी केला जाऊ शकतो, अशी शक्यता यापूर्वी व्यक्त केली जात होती. मात्र, अमेरिकन सैन्य माघारी जात असल्याने अशा कारवाईची शक्यता कमी झाल्याचे मानले जात आहे.मध्यपूर्वेतील अलीकडील संघर्षाच्या काळात इराकमधील काही अमेरिकन लष्करी ठिकाणांनाही इराणसमर्थित हल्ल्यांचा फटका बसला होता. विशेषतः ग्रीन झोन आणि एरबिलमधील लष्करी तळांना नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, इराकमधील कुर्द प्रदेशातून अमेरिकन सैन्य आणि लष्करी साहित्य हलवण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. कुर्द अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, एरबिलच्या उत्तरेकडील भागातून ही माघार सुमारे तीन आठवड्यांपूर्वी सुरू करण्यात आली. अमेरिकेने गेल्या वर्षी इराकमधील बहुतांश लष्करी तळ रिकामे केले होते. मात्र, कुर्द प्रदेशात मर्यादित अमेरिकन लष्करी उपस्थिती कायम होती. २०२४ मध्ये अमेरिका आणि इराक यांच्यात झालेल्या करारानुसार आयसिसविरोधातील अमेरिकेच्या नेतृत्वाखालील लष्करी कारवाया टप्प्याटप्प्याने संपवण्याचे ठरले होते. त्याच कराराच्या आधारे आता अंतिम माघारीची प्रक्रिया पुढे सरकत आहे.अमेरिकन अधिकाऱ्यांनीही ३० सप्टेंबरपर्यंत माघार पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, सध्या इराकमध्ये किती अमेरिकन सैनिक आहेत किंवा माघारीनंतर त्यांची पुढील तैनाती कुठे केली जाणार आहे, याबाबत अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे ३० सप्टेंबरनंतर इराकच्या सुरक्षाव्यवस्थेवर आणि अमेरिकेच्या मध्यपूर्वेतील सामरिक भूमिकेवर काय परिणाम होतो, याकडे आता लक्ष लागले आहे.