अनिल कांबळे
नागपूर,
metro job froud इंजिनीअर मुलीला महा-मेट्रोमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तहसील परिसरातील एका ४२ वर्षीय महिलेची ७ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी तहसील पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार रंजना नितीन शेंडे (४२) या गोळीबार चौक परिसरात केबलचा व्यवसाय चालवतात. त्यांची उमर फारूक अहमद नबी (४२) याच्याशी ओळख होती. उमरने यापूर्वी त्यांना घर विक्रीच्या व्यवहारात दलाल म्हणून मदत केली होती. त्यामुळे तो रंजना यांच्या दुकानात नेहमी ये-जा करीत होता. एका भेटीदरम्यान उमरने रंजना यांच्या मुलीविषयी विचारणा केली. मुलगी इंजिनीअर असल्याचे समजल्यानंतर त्याने तिला महा-मेट्रोमध्ये सरकारी नोकरी लावून देऊ शकतो, असा दावा केल्याचे तक्रारीत नमूद आहे. यानंतर उमरने रंजना यांची त्यांच्या दुकानातच देवेंद्र गोवर्धन तावळे (४५) याच्याशी ओळख करून दिली. दोघांनीही महा-मेट्रोमध्ये आपली ओळख असून मुलीला नोकरी मिळवून देण्याची क्षमता असल्याचे सांगितले. त्यामुळे रंजना यांचा त्यांच्यावर विश्वास बसला.metro job froud नोकरी लावून देण्याच्या आश्वासनावर रंजना यांनी आरोपींना ७ लाख रुपये दिले. मात्र त्यानंतर मुलीला नोकरी मिळाली नाही. तसेच वारंवार पैसे परत मागूनही आरोपींनी रक्कम परत केली नसल्याचा आरोप आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रंजना यांनी तहसील पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी उमर फारूक अहमद नबी आणि देवेंद्र गोवर्धन तावळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.