पुणे,
Another Kharat case in Pune पुण्यात अंधश्रद्धा आणि तथाकथित आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. स्वप्नील लांडे नावाच्या व्यक्तीविरोधात या प्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या फरार असल्याची माहिती आहे. स्वतःला ‘गुरुवर्य’ म्हणवून घेणाऱ्या लांडेने दैवी शक्ती प्राप्त असल्याचा दावा करत भक्तांचा विश्वास संपादन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलीला जवळ घेऊन तिच्या कानात मंत्र फुंकण्यात आला आणि अडचण आल्यास आपल्याकडे येण्यास सांगितल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर संबंधित मुलीचे समुपदेशन करण्यात आले आहे. पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला असून आरोपीने आणखी कोणाची फसवणूक किंवा शोषण केले आहे का, याचाही तपास केला जात आहे.

अंधश्रद्धा, दैवी शक्ती आणि चमत्कारांच्या नावाने कुटुंबांचा विश्वास संपादन करून त्याचा गैरफायदा घेतल्याचा आरोप या प्रकरणातून पुढे आला आहे. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा भोंदूगिरी आणि अंधश्रद्धेच्या प्रकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आरोपी सध्या फरार असल्याने त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.दरम्यान, पुण्यातील आणखी एका आध्यात्मिक गुरुंचे व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. उमेश तागुंदे, ज्यांना उमेश अप्पा तागुंदे म्हणूनही संबोधले जाते, यांच्या काही अनुयायांकडून त्यांचे पाय पाणी आणि दुधाने धुऊन ते प्राशन केले जात असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. अशा प्रकारचे एकापेक्षा अधिक व्हिडीओ प्रसारित झाल्याने या कृतीमागे अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिले जात आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला.
या संदर्भात उमेश तागुंदे यांनी भक्तांना आपले पाय धुऊन पाणी पिण्याचे कोणतेही आदेश देत नसल्याचे स्पष्ट केले. भक्त स्वतःहून अशी कृती करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आपणही आपल्या गुरुंचे पाय धुऊन पाणी पित असल्याचे त्यांनी म्हटले. भक्तांनी आपले पाय धुण्यास आपण विरोध करत असल्याचेही तागुंदे यांनी स्पष्ट केले आहे.स्वप्नील लांडेविरोधातील पॉक्सो प्रकरण आणि उमेश तागुंदे यांचे व्हायरल होत असलेले व्हिडीओ हे दोन वेगवेगळे प्रकार असले, तरी श्रद्धा आणि अध्यात्माच्या नावाखाली सुरू असलेल्या प्रथांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता लांडेविरोधातील प्रकरणात पोलिसांचा पुढील तपास महत्त्वाचा ठरणार आहे.