भारताच्या लोकप्रियतेत मोठी झेप!

ब्रिटन, जर्मनीसह अनेक देशांत सकारात्मक मत

    दिनांक :14-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Big leap in India's popularity भारताचा जागतिक प्रभाव आणि विविध देशांमधील त्याची प्रतिमा याबाबत प्यू रिसर्च सेंटरच्या नव्या सर्वेक्षणातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ३६ देशांमध्ये करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात अनेक देशांतील नागरिकांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे, भारताच्या शेजारील श्रीलंकेत भारताबद्दल सर्वाधिक सकारात्मक भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत.प्यू रिसर्चच्या सर्वेक्षणानुसार, ३६ देशांमधील सरासरी ४५ टक्के नागरिकांनी भारताबाबत सकारात्मक मत व्यक्त केले, तर ४१ टक्के नागरिकांचे मत नकारात्मक होते. मात्र, देशनिहाय आकडेवारी पाहिल्यास भारताबाबतच्या दृष्टिकोनात मोठी तफावत दिसते.
 

india
 
 
श्रीलंकेत भारताला सर्वाधिक सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून तब्बल ७९ टक्के नागरिकांनी भारताविषयी सकारात्मक मत नोंदवले. भारताच्या शेजारील देशांमध्ये भारताची मजबूत आणि सकारात्मक प्रतिमा असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होते. याउलट पाकिस्तानमध्ये भारताबाबत सकारात्मक मत व्यक्त करणाऱ्यांचे प्रमाण केवळ ७ टक्के राहिले.श्रीलंकेसोबतच केनिया आणि ब्रिटनमध्येही भारताबद्दल सकारात्मक वातावरण दिसून आले. या दोन्ही देशांमध्ये जवळपास १० पैकी ७ नागरिकांनी भारताबद्दल सकारात्मक मत व्यक्त केले. जर्मनी, इस्रायल, इटली, स्वीडन, जपान आणि थायलंडमध्येही भारताबद्दल सकारात्मक मत असलेल्या नागरिकांचे प्रमाण बहुसंख्य राहिले.युरोपातील काही देशांमध्ये भारताच्या प्रतिमेत लक्षणीय सुधारणा झाल्याचेही सर्वेक्षणातून समोर आले आहे. ब्रिटनमध्ये २०२५च्या तुलनेत भारताबद्दलच्या सकारात्मक मतांमध्ये ११ टक्क्यांनी वाढ झाली. जर्मनीत सकारात्मक मतांमध्ये ६ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. श्रीलंकेत २०२४च्या तुलनेत भारताबाबतच्या सकारात्मक मतांमध्ये तब्बल १४ टक्क्यांची वाढ झाली.जर्मनीतील आकडेवारीही भारतासाठी महत्त्वाची आहे. २०२३ मध्ये तेथील ४७ टक्के नागरिकांनी भारताबद्दल सकारात्मक मत व्यक्त केले होते. आता हे प्रमाण वाढून ६३ टक्क्यांवर पोहोचले आहे. फ्रान्समध्येही भारताच्या प्रतिमेत सुधारणा झाली असून २०२३ मध्ये ३९ टक्के असलेले सकारात्मक मतांचे प्रमाण आता ५० टक्क्यांवर गेले आहे.
 
 
 
अमेरिकेत मात्र भारताबाबतची मते तुलनेने संमिश्र असल्याचे दिसून आले. अमेरिकेतील ४५ टक्के नागरिकांनी भारताबद्दल सकारात्मक मत व्यक्त केले, तर ५० टक्के नागरिकांचे मत नकारात्मक होते. अहवालानुसार, २००८ नंतर अमेरिकेत भारताला मिळालेले हे सर्वात कमी सकारात्मक रेटिंग आहे. २०२३ मध्ये अमेरिकेतील ५१ टक्के नागरिकांचे भारताबद्दल सकारात्मक मत होते.अमेरिकेतील राजकीय विचारसरणीनुसारही भारताबाबतच्या मतांमध्ये फरक दिसून आला. डेमोक्रॅट पक्षाच्या ५० टक्के समर्थकांनी भारताबद्दल सकारात्मक मत व्यक्त केले, तर रिपब्लिकन समर्थकांमध्ये हे प्रमाण ४२ टक्के होते.भारताच्या जागतिक प्रभावाबाबतही अमेरिकन नागरिकांना प्रश्न विचारण्यात आला. त्यापैकी ५४ टक्के प्रौढ नागरिकांना भारताचा जागतिक प्रभाव साधारणपणे पूर्वीसारखाच असल्याचे वाटते. तर ३० टक्के नागरिकांनी भारताचा जागतिक प्रभाव वाढल्याचे सांगितले. केवळ १३ टक्के नागरिकांना भारताचा जागतिक प्रभाव कमी झाल्याचे वाटले.तुर्की आणि वेस्ट बँक व पूर्व जेरुसलेममध्ये भारताबाबत सकारात्मक मतांचे प्रमाण तुलनेने कमी राहिले. तुर्कीमध्ये १५ टक्के, तर वेस्ट बँक आणि पूर्व जेरुसलेममध्ये १८ टक्के नागरिकांनी भारताबद्दल सकारात्मक मत व्यक्त केले. इस्रायलमधील आकडेवारीतही राजकीय विचारसरणीनुसार फरक दिसला. डाव्या विचारसरणीच्या ४६ टक्के नागरिकांचे भारताबद्दल सकारात्मक मत होते, तर उजव्या विचारसरणीच्या नागरिकांमध्ये हे प्रमाण ६८ टक्के होते. एकूणच, या सर्वेक्षणातील आकडेवारी भारताची अनेक देशांमध्ये मजबूत आणि सकारात्मक प्रतिमा असल्याचे दाखवते. विशेषतः श्रीलंका, ब्रिटन, केनिया आणि काही युरोपीय देशांमध्ये भारताबद्दलचा वाढता सकारात्मक दृष्टिकोन हा भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावासाठी महत्त्वाचा संकेत मानला जात आहे.