साडेपाचची बस सतत उशिरा; विद्यार्थ्यांच्या तासिका ऐरणीवर!

गोंदिया बस आगाराचा ढिसाळ नियोजन, विद्यार्थी व पालकांकडून संताप

    दिनांक :14-Aug-2026
Total Views |
मुल्ला, 
gondia-bus : विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी गोंदियाहून देवरीकडे सकाळी साडेपाच वाजता सुरू करण्यात आलेली एसटी बस सध्या वारंवार उशिराने धावत असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. बसच्या विलंबामुळे विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयातील एक-दोन तासिका चुकत असून, त्याचा परिणाम त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकवर्गात कमालीचा संताप पसरलेला आहे.
 
 

gondia-bus 
 
 
 
गोंदिया-आमगाव-देवरी मार्गावर शिक्षणासाठी दररोज प्रवास करणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयात वेळेत पोहोचता यावे, या उद्देशाने गोंदिया एसटी आगारातून सकाळची साडेपाच वाजताची एसटी बस सुरू करण्यात आली होती. मात्र, ही बस निर्धारित वेळेत पोहोचत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बस सुरू केली, मग वेळेचे नियोजन का नाही? असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. बस उशिराने पोहोचल्यामुळे महत्त्वाच्या तासिका चुकत असून, हजेरी तसेच अभ्यासक्रम पूर्ण करण्यावरही परिणाम होत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, एसटी महामंडळाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून या बसचे वेळापत्रक सुरळीत करावे आणि साडेपाचची बस निर्धारित वेळेत धावेल, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी विद्यार्थी व पालकांकडून होत आहे.
 
 
अन्यथा आंदोलनाचा मार्ग
 
 
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी संबंधित या प्रश्नाकडे एसटी महामंडळाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी जोर धरत असून वारंवार होणारा विलंब थांबला नाही, तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला आहे.