दर्यापूर,
councilor-join-shiv-sena : दर्यापूर नगरपालिकेची निवडणूक एकहाती जिंकून सत्ता मिळवणाऱ्या काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला आहे. तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुधाकर भारसाकळे यांच्या नेतृत्वात नगराध्यक्षासह तब्बल १५ नगरसेवकांनी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. या प्रवेशामुळे दर्यापूर नगरपालिकेत काँग्रेसचे अस्तित्वच पुसले गेले आहे. नगरपालिकेच्या २५ जागांपैकी १७ जागा जिंकून काँग्रेसने सत्ता मिळवली होती. मात्र पक्षश्रेष्ठींच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत भारसाकळे यांनी काही महिन्यांपूर्वीच तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी शिंदे गटाशी जवळीक साधली.

मुंबईतील पक्षप्रवेश कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित होते. यांसह वरिष्ठ नेते बचू कडू हे देखील उपस्थिती होते. स्वीकृत सदस्यांनी देखील प्रवेश घेतला आहे. त्यांच्या उपस्थितीत दर्यापूरच्या नगराध्यक्ष मंदाकिनी सुधाकर भारसाकळे, गटनेते, नगरपालिकेतील विषय समितीचे सभापती यांच्यासह १५ नगरसेवकांनी शिवबंधन बांधले. केवळ एक नगरसेवकच आता काँग्रेसमध्ये उरले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला आहे. या राजकीय भूकंपामुळे दर्यापूरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या १० वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या दर्यापूरमध्ये आता शिंदे गटाची एकहाती सत्ता स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्रवेशानंतर बोलताना सुधाकर भारसाकळे म्हणाले, काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांना मान-सन्मान राहिला नाही. विकासासाठी आणि दर्यापूरच्या प्रगतीसाठी आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा निर्णय घेतला. दरम्यान, या घडामोडींनंतर जिल्हा काँग्रेसने तातडीची बैठक बोलावली आहे. निवडून दिल्यानंतर पक्षाशी बेईमानी करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिली. आता दर्यापूर नगरपालिकेतील सत्तासमीकरण पूर्णपणे बदलणार असून, पुढील काळात विकासकामांच्या निधीचे वाटप कसे होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.