ढाका,
Cricketer kills coach in Sri Lanka भारत आणि श्रीलंका यांच्यात १५ ऑगस्टपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी श्रीलंकेच्या क्रिकेटविश्वाला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. क्रिकेट सामन्यादरम्यान झालेल्या वादात गंभीर जखमी झालेल्या माजी क्रिकेट प्रशिक्षक सुमित फर्नांडो यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी श्रीलंकेच्या पोलिसांनी १७ वर्षीय अल्पवयीन खेळाडूला अटक केली आहे.सुमित फर्नांडो हे ६२ वर्षांचे होते. ८ ऑगस्ट रोजी कोलंबो येथे क्रिकेट सामना सुरू असताना पिण्याच्या पाण्यावरून दोन खेळाडूंमध्ये वाद झाला. सुरुवातीला झालेली बाचाबाची काही वेळातच वाढली. यावेळी फर्नांडो यांनी या वादात हस्तक्षेप केला. त्यानंतर त्यांच्यावर कथितरीत्या हल्ला करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
हल्ल्यानंतर फर्नांडो यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी उपचार सुरू ठेवले; मात्र ११ ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर श्रीलंकेच्या क्रिकेट क्षेत्रात शोक व्यक्त करण्यात आला.पोलिसांनी या प्रकरणात १० ऑगस्ट रोजी १७ वर्षीय अल्पवयीन खेळाडूला अटक केली. त्याला ११ ऑगस्ट रोजी कोलंबोतील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला १७ ऑगस्टपर्यंत बाल सुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेत सहभागी असलेल्या इतर खेळाडूंचीही चौकशी सुरू असून पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जात आहे.
सुमित फर्नांडो यांचे श्रीलंकेच्या क्रिकेटमध्ये महत्त्वाचे योगदान होते. मोरातुवा येथील प्रिन्स ऑफ वेल्स कॉलेजमध्ये ते माजी क्रिकेट प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी अनेक युवा क्रिकेटपटूंना प्रशिक्षण दिले. श्रीलंकेचा माजी कर्णधार कुसल मेंडिस यालाही त्याच्या सुरुवातीच्या क्रिकेट कारकिर्दीत फर्नांडो यांनी मार्गदर्शन केले होते. त्यामुळे युवा क्रिकेटपटूंमध्ये ते अनुभवी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून परिचित होते.फर्नांडो यांच्या निधनानंतर श्रीलंकेच्या क्रिकेटविश्वातून दुःख व्यक्त करण्यात आले. १३ ऑगस्ट रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भारत-श्रीलंका कसोटी मालिकेला सुरुवात होण्याच्या अवघ्या दोन दिवस आधी ही घटना समोर आल्याने श्रीलंकेच्या क्रिकेट वर्तुळातही या घटनेची चर्चा आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरू असून या वादामागील नेमकी परिस्थिती आणि घटनेतील इतरांची भूमिका तपासातून स्पष्ट होण्याची शक्यता आहे.