जालना
devendra fadnavis जालना जिल्हा भाजपच्या नूतन कार्यालयाच्या भूमिपूजनासह आयोजित करण्यात आलेल्या भव्य शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याची मोठी घोषणा केली. कोल्हापूर आणि सांगलीच्या पूरपाण्याचा उजनी धरणात विनियोग करण्याबरोबरच पश्चिम वाहिनी नद्यांचे ८० टीएमसी पाणी कोकणातून थेट मराठवाड्यात आणि गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याचा सरकारचा निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले. “या पिढीने दुष्काळ पाहिला; पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही. दुष्काळमुक्त मराठवाडा आम्ही करून दाखवू,” असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
जालना जिल्हा भाजपच्या नूतन कार्यालयाच्या भूमिपूजनाचा दिवस कार्यकर्त्यांसाठी आनंदाचा असल्याचे सांगताना फडणवीस म्हणाले की, एखादी व्यक्ती स्वतःचे घर बांधते तेव्हा संपूर्ण कुटुंबाला आनंद होतो. त्याचप्रमाणे आज भाजपच्या कार्यकर्त्याला आनंद होत आहे. कार्यकर्त्याच्या हक्काचे घर आज तयार होत असून, पक्षासाठी अतिशय चांगला भूखंड निवडण्यात आला आहे. भाजप आज देशातील सर्वांत मोठा पक्ष असल्याचेही त्यांनी नमूद केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकसित होत असून, २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्याचे काम झाल्याचा दावा फडणवीस यांनी केला. मोदी यांनी परिवर्तन घडवून आणले असून देशातील नागरिक वेगवान जीवन जगत आहेत. शिक्षणाची नवी दालनेही खुली होत असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठवाड्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट करताना फडणवीस यांनी जलव्यवस्थापनाचा आराखडा मांडला. कोल्हापूर आणि सांगलीच्या पूरपाण्याचा उजनी धरणात आणण्याचा प्रयत्न केला जाणार असून, पश्चिम वाहिनी नद्यांचे ८० टीएमसी पाणी कोकणातून मराठवाड्यात आणि गोदावरीच्या खोऱ्यात आणले जाणार आहे. या माध्यमातून मराठवाड्याला कायमस्वरूपी दुष्काळाच्या संकटातून मुक्त करण्याचा सरकारचा निर्धार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जालना जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाचाही फडणवीस यांनी उल्लेख केला. समृद्धी महामार्गाच्या निर्मितीवेळी छत्रपती संभाजीनगर आणि जालना हे महाराष्ट्रातील पुढील औद्योगिक केंद्र ठरतील, असे आपण सांगत होतो आणि आज ते प्रत्यक्षात येताना दिसत आहे, असे ते म्हणाले. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उद्योग येत असून कनेक्टिव्हिटी वाढली आहे. ड्रायपोर्ट सुरू झाला असून, जालन्यात सिल्क सिटी उभारण्यासाठी पहिली बाजारपेठ सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे भविष्यात जालन्याची ओळख ‘३एस’ म्हणजेच स्टील, सीड्स आणि सिल्क सिटी अशी होणार असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.
जालना जिल्ह्याच्या विकासाचाdevendra fadnavis मोठा आराखडा तयार करण्यात आला असून, त्यासाठी येथील खासदार आणि आमदारांनी कष्ट घेतल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा विकासाच्या दिशेने अग्रेसर झाला असून त्याची विकासाची वाटचाल सुरू झाली आहे. जालना जिल्हा भाजपवर प्रेम करणारा असून, राज्यात भाजपची सत्ता नसतानाही जिल्ह्याने पक्षाला साथ दिली आहे. त्यामुळे सर्वांच्या साक्षीने जालना जिल्ह्याच्या विकासात कोणतीही कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी विविध योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
२०१४ पूर्वी भारताची ओळख अविकसित देश म्हणून केली जात होती; मात्र आज नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत हा जगातील सर्वांत वेगवान आणि विकसित देश म्हणून ओळखला जात असल्याचे फडणवीस म्हणाले. राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला असून, काँग्रेसप्रमाणे केवळ घोषणा करून लबाडी केली नाही, असा टोला त्यांनी लगावला. राज्यातील ७६ टक्के शेतकऱ्यांना सध्या दिवसा वीज मिळत असून लवकरच १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यात येईल. सौर कृषी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना १२ तास वीज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या थकीत वीजबिलाबाबतही फडणवीस यांनी घोषणा केली. “काही पोपट बोलायला लागले आहेत,” असा विरोधकांवर निशाणा साधत ५५ हजार शेतकऱ्यांचे थकीत वीजबिल माफ करून त्यांना बेबाकी प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्जमाफीची योजना जाहीर केली होती आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी भरभरून मतदान केले. विरोधकांकडून कर्जमाफी दिली जाणार नसल्याचे सांगितले जात होते; मात्र कोणतीही निवडणूक नसताना सरकारने दिलेले वचन पाळून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे काम केले, असा दावा फडणवीस यांनी केला. २०२० मध्ये उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफी दिली, त्यावेळी २०१७ पूर्वीची कर्जे मिळणार नाहीत, असे सांगण्यात आले होते. मात्र आपल्या सरकारने सरसकट कर्जमाफी दिली असून हे शेतकऱ्यांचे सरकार असल्याचे त्यांनी म्हटले.लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नसून लाभार्थींना पैसे देत राहणार असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. आता लाडक्या बहिणींना ‘लखपती दीदी’ बनविण्याचे उद्दिष्ट असून, सध्या ५० लाख लाडक्या बहिणी झाल्या आहेत; त्यांची संख्या एक कोटीपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.