वर्धा,
Employees sit in front of the president's house सेवाग्राम येथील बापूरावजी देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयातील वेतनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तब्बल ६७ महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने महाविद्यालयातील ८९ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी संस्थेचे अध्यक्ष समीर देशमुख यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. किमान एका महिन्याचे तरी १०० टक्के वेतन तातडीने देण्यात यावे, ही आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसह एकूण ११२ जण गेल्या ६७ महिन्यांपासून वेतनाविना काम करत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. वेतनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून त्यावरून संस्थेचे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचले आहे. न्यायालयाने संस्थेला कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचे आदेश दिले असतानाही आदेशानंतर ३२ महिन्यांचे वेतन अद्याप मिळाले नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.
सततच्या वेतन थकबाकीमुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून मुलांचे शिक्षण, घरखर्च आणि वैद्यकीय उपचारांचा खर्च भागवणे कठीण झाल्याचे आंदोलकांनी सांगितले. वेतनासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही ठोस तोडगा न निघाल्याने अखेर संस्थाध्यक्षांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.२४ जुलै रोजी अध्यक्षांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत किमान एका महिन्याचे १०० टक्के वेतन देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी २७ जुलै रोजी वेतन कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचा दावा आंदोलकांनी केला. मात्र १५ ऑगस्ट उजाडूनही खात्यात वेतन जमा झाले नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी सांगितले.
महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे वेतनाबाबत विचारणा केली असता त्यांच्या हातात काहीही नसल्याचे सांगितले जाते, असा आरोपही कर्मचाऱ्यांनी केला. त्यामुळे गुरुवारपासून अध्यक्षांच्या निवासस्थानासमोर ठिय्या देत असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्ष समीर देशमुख आणि माजी अध्यक्ष सुरेश देशमुख यांनी कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला.न्यायालयाच्या आदेशानंतर मागील दिवाळीत एक महिन्याचे वेतन देण्यात आले. त्यानंतर मात्र २५ टक्के, ६० टक्के तसेच ३ हजार आणि ५ हजार रुपये अशा स्वरूपात रक्कम देऊन कर्मचाऱ्यांची बोळवण करण्यात आल्याचा दावा आंदोलकांनी केला. यापूर्वीही वेतनासाठी कर्मचाऱ्यांनी २०२३ मध्ये सत्याग्रह केला होता. हा सत्याग्रह तब्बल १० महिने चालला होता. त्यावेळी माजी अध्यक्ष सुरेश देशमुख यांनी ६० टक्के वेतन देण्याचे मान्य केल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
वेतन थकीत असतानाच महाविद्यालयातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटीही अद्याप देण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. संस्थेच्या माजी अध्यक्ष सुरेश देशमुख यांचा वाढदिवस कर्मचाऱ्यांकडून पैसे जमा करून साजरा करण्यात आला; मात्र त्याच कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी संस्थेकडे निधी नसल्याबाबत आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली.वेतनाच्या प्रश्नामुळे या महाविद्यालयातील अनेक अनुभवी प्राध्यापकांनी नोकरी सोडल्याचेही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. काही वर्षांपूर्वी मध्य भारतातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणून ओळख असलेल्या या संस्थेतील वाद आता न्यायालयीन पातळीवर पोहोचला आहे. त्यामुळे थकीत वेतनाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. या आंदोलनात जितेंद्र काशीकर, राहुल ढोक, मोरेश्वर इसाळ, गजानन डंभारे, सुनील पणत, शेख रमजान, श्याम अजगरे, सुरेश देवढे, विजय बिस्ट, अरुण कडू, मनोज रूमाले यांच्यासह ८९ कर्मचारी सहभागी झाले आहेत.