पुणे,
Extradition of Virendra Baisoya to India पुण्यातील तब्बल ६,००० कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपी असलेल्या वीरेंद्र सिंग बैसोया याला दुबईतून भारतात आणण्यात तपास यंत्रणांना यश आले आहे. अमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित मोठ्या नेटवर्कमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप असलेल्या बैसोयाला शुक्रवारी एअर इंडियाच्या ४३१० क्रमांकाच्या विमानाने भारतात आणण्यात आले.वीरेंद्र बैसोयाविरोधात राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. त्यानंतर दुबईमध्ये त्याला अटक करण्यात आली. भारत सरकारच्या प्रयत्नांनंतर त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यात आले. या कारवाईमुळे परदेशात लपून बसलेल्या अमली पदार्थ तस्करांविरोधातील तपास यंत्रणांच्या मोहिमेला मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे.

बैसोयाचे नाव दिल्ली पोलिसांच्या अमली पदार्थ प्रकरणातील प्रमुख आरोपी संदीप धुनियाशी जोडले गेले आहे. पुण्यातील ६,००० कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणातही संदीप धुनिया आरोपी आहे. मात्र, धुनिया दुबईतून पाकिस्तानात पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे तो अद्याप भारतीय तपास यंत्रणांच्या हाती लागलेला नाही.गृहमंत्री अमित शाह यांनी बैसोयाच्या प्रत्यार्पणानंतर समाजमाध्यमावरील पोस्टद्वारे केंद्र सरकारच्या कारवाईचे समर्थन केले. परदेशात आश्रय घेणाऱ्या अमली पदार्थ तस्करांचा शोध घेऊन त्यांचे नेटवर्क उद्ध्वस्त केले जात असल्याचे त्यांनी म्हटले. अमली पदार्थांविरोधातील सरकारच्या ‘शून्य-सहिष्णुता’ धोरणाचा उल्लेख करत त्यांनी एनसीबीने वीरेंद्र सिंग बैसोयाला यूएईमधून यशस्वीरित्या भारतात आणल्याचे सांगितले. आरोपी कुठेही लपला तरी भारतीय कायद्यापासून त्याची सुटका होऊ शकत नाही, असा संदेशही त्यांनी दिला.
तपासात वीरेंद्र बैसोया एका मोठ्या आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करीच्या नेटवर्कशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. लंडनला मेफेड्रोनची मोठी खेप पाठवण्याच्या कटात त्याचा सहभाग असल्याचा तपास यंत्रणांचा आरोप आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी २१ फेब्रुवारी २०२४ रोजी दिल्लीत दिवेश चरणजीत भुतानी आणि संदीपकुमार राजपाल बसोया यांना अटक केली होती.या कारवाईदरम्यान तपास यंत्रणांनी तब्बल ९७० किलो मेफेड्रोन जप्त केले. हा अमली पदार्थांचा साठा लंडनला पाठवण्याची तयारी करण्यात आली होती. डेल्टा लॉजिस्टिक्सच्या माध्यमातून या खेपेचे नियोजन करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. तपासानुसार, दिवेश चरणजीत भुतानी आणि संदीपकुमार राजपाल बैसोया हे वीरेंद्र सिंग बैसोया यांच्या निर्देशानुसार काम करत होते. परदेशात अमली पदार्थांचा पुरवठा आणि त्यांची पाठवणी यामध्ये वीरेंद्रची महत्त्वाची भूमिका असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. या प्रकरणात डेल्टा लॉजिस्टिक्सचे मालक संदीप हनुमानसिंग यादव आणि कंपनीचे व्यवस्थापक देवेंद्र रामफुल यादव यांनाही २१ फेब्रुवारी २०२४ रोजी अटक करण्यात आली होती.तपास यंत्रणांच्या मते, या नेटवर्ककडून मोठ्या प्रमाणावर मेफेड्रोन परदेशात पाठवण्यासाठी लॉजिस्टिक्स आणि मालवाहतूक व्यवस्थेचा वापर केला जात होता. ९७० किलो मेफेड्रोनची जप्ती या नेटवर्कच्या व्याप्तीचे गांभीर्य अधोरेखित करते. दरम्यान, वीरेंद्र बैसोयाचा मुलगा ऋषभ हा सध्या परदेशात असल्याचे मानले जाते. त्याच्याविरोधातही रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज नेटवर्कमधील इतर आरोपी आणि परदेशातील संपर्कांचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणांकडून पुढील कारवाई सुरू राहण्याची शक्यता आहे.