देवळी
har ghar tiranga पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार रामदास तडस साहेब यांच्या सक्रीय सहभागात देवळी शहरात भाजपा देवळी शहराच्या वतीने तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय गाते यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला.
रॅलीच्या सुरुवातीला जिल्हाध्यक्ष संजय गाते मार्गदर्शन करताना म्हणाले की, देवळी शहरात हर घर तिरंगा अभियान मोठ्या उत्साहात राबविण्यात येत आहे. तिरंगा ध्वजाच्या प्रत्येक रंगात राष्ट्रभक्तीची भावना सामावलेली आहे. या राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि गौरव जपत भारतमातेला परमवैभवापर्यंत पोहोचवणे हेच आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याच राष्ट्रभक्तीच्या भावनेतून यंदाही हर घर तिरंगा अभियानात आपण सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या घरावर डौलाने तिरंगा ध्वज फडकवावा, असे ते म्हणाले.
रॅलीत नप उपाध्यक्ष राहुल चोपडा, माजी नगराध्यक्ष शोभा तडस, शिक्षण व क्रीडा सभापती शुभांगी कुर्जेकर, सभापती मनिषा लोखंडे, विजय गोमासे प्रेमेंद्र ढोक, गटनेता उमेश कामडी, रविंद्र कारोटकर, नगरसेवक आदींसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
रॅलीच्या आयोजनाकरिता तिरंगा रॅली संयोजक रविंद्र कारोटकर, योगेश आदमने, अमोल काकडे यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक रवि कारोटकर यांनी केले आभार विद्या झिलपे यांनी मानले.