अमरावती,
cable-stealing-gang : स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सोलर प्लांट व शेतातील केबल चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चोरीचा केबल जाळून तांबे विकत घेणाऱ्या २ भंगार विक्रेत्यांसह २ आरोपींना अटक करण्यात आली असून, २ आरोपी फरार आहेत. आरोपींकडून चोरीचा केबल जाळून काढलेले तांबे, वाहने आणि मोबाईल असा एकूण ६ लाख ९१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
चांदूर रेल्वे तालुक्यातील सोनगाव येथील सोलर प्लांटमध्ये ७ ऑगस्टच्या रात्री चोरट्यांनी २ लाख ३० हजार रुपये किमतीचे लाल-काळ्या रंगाचे केबल, डी. सी. केबल आणि केबल हॉरनेस वायर चोरी केले होते. याप्रकरणी कंपनीचे इलेक्ट्रिकल इंजिनिअर सहदेव चौधरी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना, पथकाने संशयावरून आरोपी रुतेश मनचरण भोसले रा. रातरोडा, चांदूर रेल्वे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे आणि कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोलर प्लांट व शेतातून केबल चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेला केबल जाळून त्यातील तांब्याची तार अमरावतीच्या भंगार विक्रेत्यांना विकल्याचे आरोपीने निष्पन्न केले. जप्त केलेला एकूण मुद्देमाल ६ लाख ९१ हजार २०० रुपयांचा होता.
या कारवाईमुळे परिसरातील चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे व कुऱ्हा पोलीस ठाणे हद्दीतील एकूण ५ मोठे गुन्हे उघडकीस आले आहेत. अटकेतील आरोपींची नावे रुतेश मनचरण भोसले, अश्विन सुरेंद्र भोसले दोघेही रा. चांदूर रेल्वे अशी असून भंगारवाले फैजान शहा रहमत शहा व अफान खान इरफान खान दोघेही रा. अमरावती यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे. राहूल सुंभर भोसले व सुंभर सनातन भोसले (दोघे रा. चांदूर रेल्वे) हे फरार आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात पार पडली. यामध्ये पीएसआय रोहित कुदळे, एएसआय मनोज चचेरे, पोलीस अंमलदार गजेंद्र ठाकरे, कर्मचारी नीलेश डांगोरे, सुधीर बावणे, शिवाजी घुगे, सचिन गायधने, श्याम गावंडे, दिनेश कनोजिया आणि चालक एएसआय संजय प्रधान यांचा सहभाग होता.