मुंबई
jhimmad 2026 मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार आपल्या अभिनयातून नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. मात्र, यावेळी हेच कलाकार कॅमेऱ्यापासून दूर जात पावसाळी वातावरणात एकत्र आले आणि त्यांनी मनसोक्त धमाल केली. अभिनेता-दिग्दर्शक पुष्कर श्रोत्री यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या ‘झिम्माड’ या विशेष पावसाळी मेळाव्यात मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार सहभागी झाले होते. पुण्याजवळील मॅरीगोल्ड बॅन्क्वेट्सच्या ‘डी लश’ येथे रंगलेल्या या सोहळ्याने कलाकारांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं, तर जुन्या मैत्रीच्या आठवणींनाही उजाळा मिळाला.
सुबोध भावे, स्वाती चिटणीस, मंदार चोळकर, शशांक केतकर, जयवंत वाडकर, विजय पाटकर, सुशांत शेलार, शंतनू मोघे, प्रिया बेर्डे, तुषार दळवी, रेशम टिपणीस, भरत दाभोळकर, मकरंद अनासपुरे, विशाखा सुभेदार, पंढरीनाथ कांबळे, सागर कारंडे, पुष्कर जोग, अवधूत गुप्ते, स्वप्निल बांदोडकर, अभिजीत पानसे, सचित पाटील यांच्यासह अनेक मराठी कलाकारांनी ‘झिम्माड’मध्ये सहभाग घेतला.
सकाळपासूनच कलाकारांच्या आगमनाने ‘डी लश’चा परिसर गजबजून गेला होता. नेहमी शूटिंगच्या धावपळीत भेटणाऱ्या कलाकारांना यावेळी कामाची कोणतीही घाई नव्हती. त्यामुळे मनसोक्त गप्पा, खेळ, नाच-गाणी आणि हास्यविनोद करत कलाकारांनी हा दिवस आनंदात घालवला. पावसाळ्याच्या वातावरणाला साजेशा खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेत सर्वांनी या निवांत भेटीचा पुरेपूर आनंद लुटला.
‘झिम्माड’मध्ये मैत्री, पाऊस आणि कलाविष्काराचा सुंदर मेळ पाहायला मिळाला. राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रवींद्र हिने सादर केलेल्या गणेशस्तवनाने या मैफलीची सुरुवात झाली. त्यानंतर गायक-संगीतकार मिलिंद इंगळे यांनी लोकप्रिय ‘गारवा’मधील कविता आणि गाणी सादर करत मैफलीत रंग भरला. ‘गारवा’च्या शब्द-सुरांनी उपस्थित कलाकारांमधील जुन्या आठवणी जाग्या केल्या आणि सर्वांना पावसाच्या रम्य आठवणींच्या प्रवासावर नेलं.
यासोबतच पावसाच्या विविध छटा सुरांतून उलगडणारी विशेष संगीत मैफलही रंगली. आर्या आंबेकर, विश्वजीत जोशी, सावनी रवींद्र आणि अजित परब यांनी लोकप्रिय गाणी सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. त्यांच्या सुरांना कलाकारांनी उत्स्फूर्त दाद दिली. खास आग्रहास्तव अभिनेता पंढरीनाथ कांबळी आणि आस्ताद काळे यांनीही सुरेल गाणी सादर केली. इतकंच नव्हे, तर पुष्कर श्रोत्री यांनाही उपस्थितांनी गाणं सादर करण्याचा आग्रह केला.
संगीतासोबतच कवितांमधूनही jhimmad 2026 पावसाळी वातावरणाची रंगत वाढली. समीर सामंत आणि मंदार चोळकर यांनी कविता सादर केल्या. त्यामुळे गीत, संगीत आणि कवितेच्या माध्यमातून पावसाळी वातावरणाचा अनुभव देणारा हा कलाविष्कार ‘झिम्माड’च्या सोहळ्याची खासियत ठरला.या आनंदाच्या वातावरणात कृतज्ञतेचा भावही तितक्याच आपुलकीने जपण्यात आला. मराठी मनोरंजनसृष्टीत आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांचा आणि पत्रकारांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे, लीला गांधी आणि फैय्याज, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे आणि मोहन जोशी तसेच ज्येष्ठ पत्रकार अशोक राणे यांना कलाकारांच्या वतीने कृतज्ञता सन्मान प्रदान करण्यात आला. आपल्या आधीच्या पिढीच्या योगदानाप्रती आदर व्यक्त करणारा हा भावनिक क्षण ठरला. दिग्दर्शक प्रविण तरडे यांना ‘देऊळबंद-2’साठी ‘झिम्माड धुंव्वाधार सन्मान’ प्रदान करण्यात आला.‘झिम्माड’मध्ये ज्येष्ठांपासून नवोदितांपर्यंत अनेक कलाकार एका छताखाली एकत्र आले. कलाकार म्हणून नव्हे, तर मित्र म्हणून एकमेकांसोबत वेळ घालवण्याचा या उपक्रमाचा उद्देश यंदाच्या सोहळ्यातही प्रकर्षाने जाणवला. शूटिंगच्या धावपळीत राहून गेलेल्या गप्पा, जुन्या आठवणी, नव्या ओळखी आणि संगीत-कवितेच्या मैफलीमुळे हा दिवस सर्वांसाठीच खास ठरला.या संपूर्ण सोहळ्याचं नियोजन मानसी इंगळे यांच्या ‘सुरेल क्रीएशन्स्’तर्फे करण्यात आलं. त्यांना जुन्या जाणत्या ॲडव्हर्टायझर पराग शहाणे यांची साथ लाभली. पावसाळ्याच्या निमित्ताने एकत्र आलेल्या या कलाकारांच्या मैत्रीपूर्ण मेळाव्याने मनोरंजनसृष्टीतील नात्यांना आणि जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला.