मध्य प्रदेशातील दरोड्याचा गोंदियात उलगडा

- सात आरोपी पोलिसांच्या ताब्यात ः ५.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त

    दिनांक :14-Aug-2026
Total Views |
गोंदिया, 
madhya-pradesh-robbery-case : मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात घडलेल्या दरोड्याच्या घटनेचा गोंदिया पोलिसांनी उलगडा केला असून दरोड्यात लुटलेले सोने-चांदीचे ऐवज व रोख रक्कम घेऊन गोंदियात आलेल्या सात संशयितांना ५.३९ लाख रुपयांचा मुद्देमालासह शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. किसन ऊर्फ डेनी कमल अजित, राज ऊर्फ चिट्टा ओमकार लहरे, मयंक केशव मनोठे, दर्शन सुनील जगने, मयुर संजय गजापुरे, प्रणय देवेंद्र मेश्राम आणि शुभम विठ्ठल गंधे अशी आरोपींची नावे आहे. सर्व सातही आरोपींना पुढील तपासासाठी मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
 
 
 
madhya-pradesh-robbery-case
 
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १३ ऑगस्ट रोजी शहर पोलिस ठाण्याचे पथक पेट्रोलिंग करीत असताना शहरातील मडी चौक येथे किसन ऊर्फ डेनी कमल अजित रा. सूर्याटोला/गोंदिया आणि मयंक केशव मनोठे रा. कुंभारेनगर हे दोघेही संशयास्पदरीत्या आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून ३ लाख ९४ हजार रुपये किमती सोन्याचे मंगळसूत्र, अंगठ्या, कानातील लटकन, लहान मुलांचे सोन्याचे कडे, सोन्याची चैन, सोन्याचे मणी, नाकातील खडा, कमरबंध तसेच चांदीच्या पायल्या व बिछियासह १ लाख ४५ हजार रुपये रोख असा ५ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
 
 
मुद्देमालाबाबत दोघांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करून अधिक कसून चौकशी केली असता, दोघांनी इतर पाच साथीदारांसह मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील एका घरात दरोडा टाकून सदर मुद्देमाल गोंदियात आणल्याची कबूली दिली. यावर शहर पोलिसांनी मध्य प्रदेशातील बालाघाट येथील पोलिस निरीक्षक कामेशकुमार धुमकेती यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या दरोड्याची पुष्टी केली. दरम्यान, बालाघाट पोलिसांचे पथक तसेच दरोड्यातील फिर्यादीने गोंदिया शहर पोलिस ठाणे गाठून सातही संशयितांची ओळख पटविल्यानंतर सर्व सातही आरोपींना पुढील तपासासाठी मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.