तीन मित्र, घरभर पसारा आणि गूढ ‘मांजर’

आगामी मराठी चित्रपटाचं भन्नाट पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

    दिनांक :14-Aug-2026
Total Views |
मुंबई
manjar marathi movie poster तीन मित्र, घरभर पसरलेला पसारा आणि त्यातून निर्माण झालेला सगळा गोंधळ… या भन्नाट कुतूहलाची झलक दाखवत ‘मांजर’ या आगामी मराठी चित्रपटाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. पोस्टर पाहिल्यानंतर ‘मांजर’ आणि या सगळ्या गोंधळाचा नेमका काय संबंध, असा प्रश्न नक्कीच पडतो.
 

manjar marathi movie poster three friends, chaos and a mysterious cat 
घरातील पसारा, बिनधास्त मित्रांची गँग आणि त्यांचं बेफिकीर जगणं या चित्रातून ‘मांजर’ ही केवळ तीन मित्रांची गोष्ट नसून हसवणाऱ्या आणि गोंधळात टाकणाऱ्या घटनांनी भरलेली धमाल कॉमेडी असल्याची झलक मिळते. पोस्टरमध्ये दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे एखादा भन्नाट किस्सा दडलेला आहे का, याची उत्सुकताही निर्माण होते.
एचथ्रीओ मोशन पिक्चर्स आणि जस्ट राईट फिल्म्स निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन सुशील महादेव यांनी केलं आहे. सिद्धार्थ मेनन, ओंकार भोजने, तेजस राऊत आणि भाग्यश्री लिमये यांच्या प्रमुख भूमिका असून पोस्टरमध्ये या चौघांची धमाल केमिस्ट्री पाहायला मिळते.
पोस्टरमधील घराचा अस्ताव्यस्त पसारा विशेष लक्ष वेधून घेतो. कपडे, मोबाईल, लॅपटॉप, इअरफोन्स, बॅग्ज आणि रोजच्या वापरातील विविध वस्तूंमध्ये तीन मित्र अक्षरशः बिनधास्त लोळताना दिसतात. या सगळ्या गोंधळामध्ये ‘मांजर’ या नावाभोवती नेमकं काय घडलं आहे आणि त्याचा या मित्रांच्या निवांत विश्वावर कसा परिणाम झाला आहे, याचं उत्तर पोस्टर देत नाही. उलट, त्यामुळे चित्रपटाबद्दलचं कुतूहल आणखी वाढतं.
दिग्दर्शक सुशील महादेव यांनी सांगितलं की, ‘मांजर’मध्ये तीन मित्रांचं मोकळंढाकळं विश्व आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भन्नाट परिस्थिती पाहायला मिळणार आहेत. मांजर हा त्यांच्या जगाचा आधीपासूनच एक भाग आहे; मात्र त्याच्याभोवती घडणाऱ्या घटनांमुळे त्यांच्या आयुष्यात मजेशीर परिस्थिती निर्माण होते. पात्रांची केमिस्ट्री, कॉमेडी आणि या सगळ्या गोंधळामागचं कारण प्रेक्षकांचं मनोरंजन करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र मांजराचं या संपूर्ण कथेत नेमकं काय स्थान आहे, हे सध्या गुलदस्त्यातच ठेवण्यात आलं आहे.हर्ष, अविनाश शर्मा, हरि राजपूत, बंटी नागी आणि जसबीर नागी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सयाजी शिंदे, अंशुमन विचारे, वैष्णवी अंधाडे आणि अश्विनी काळसेकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी एए फिल्म्सने सांभाळली आहे.‘मांजर’ हा चित्रपट येत्या 18 सप्टेंबर 2026 रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे तीन मित्रांच्या निवांत आयुष्यात ‘मांजर’मुळे नेमका कोणता गोंधळ निर्माण होतो, हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.