अमरावतीत राष्ट्रीय वस्त्र विद्यापीठ स्थापन करा

डॉ. अनिल बोंडे यांची केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांकडे मागणी

    दिनांक :14-Aug-2026
Total Views |
अमरावती, 
anil-bonde : विदर्भ हा देशातील प्रमुख कापूस उत्पादक भाग असूनही येथे वस्त्रोद्योग शिक्षण, तंत्रज्ञान आणि संशोधनाचा अपेक्षित विकास झालेला नाही. ही मोठी उणीव भरून काढण्यासाठी अमरावती येथे राष्ट्रीय स्तरावरील वस्त्र विद्यापीठ स्थापन करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्राचे माजी कृषिमंत्री तथा राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
 
 
 
JK
 
 
 
खा. डॉ. बोंडे यांनी पत्रात नमूद केले की, विदर्भात कापसाचे विपुल उत्पादन होऊनही प्रक्रिया उद्योग आणि उच्च शिक्षण संस्थांच्या अभावामुळे मूल्यवर्धन मर्यादित राहते. यामुळे स्थानिक तरुणांना रोजगारासाठी इतर राज्यांत स्थलांतर करावे लागते. अमरावतीत राष्ट्रीय वस्त्र विद्यापीठ स्थापित झाल्यास टेक्स्टाईल तंत्रज्ञान, फॅशन तंत्रज्ञान आणि वस्त्र क्षेत्रातील संशोधनाला मोठा वेग मिळेल. शिक्षण, संशोधन आणि उद्योग यांच्यात मजबूत ताळमेळ बसवून विदर्भातील "कॉटन टू क्लॉथ" (कपास ते कापड) या संकल्पनेला अधिक सशक्त करता येईल, असा विश्वास खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान व्यक्त केला.
 
याशिवाय अमरावतीत वस्त्र विद्यापीठासोबतच अचलपूर येथील बंद पडलेली ऐतिहासिक एनटीसी (NTC) फिनले मिल पुनरुज्जीवित करून तिचे आधुनिकीकरण करण्याची मागणी खा. डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे. ही मिल विदर्भाच्या औद्योगिक वारशाचा महत्त्वाचा भाग असून, ती पुन्हा सुरू झाल्यास स्थानिक कामगार, विणकर आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना थेट रोजगाराचा व आर्थिक लाभाचा मार्ग उपलब्ध होईल, असे त्यांनी पत्रात नमूद केले.
 
 
तसेच खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केंद्रीय मंत्र्यांना दिलेल्या पत्रात अमरावती येथील मंजूर 'पीएम मित्रा' टेक्सटाईल पार्कच्या कामाला गती देण्याची मागणी केली आहे. जमिनीचे वाटप, पायाभूत सुविधांचा विकास आणि पर्यावरणविषयक मंजुऱ्यांची प्रक्रिया वेगाने पूर्ण करून या प्रकल्पाचे काम वेळेत सुरू करावे, जेणेकरून मोठ्या प्रमाणावर खाजगी गुंतवणूक आकर्षित होऊन स्थानिक तरुण व महिलांना रोजगाराच्या संधी मिळतील, असे खा. बोंडे यांनी स्पष्ट केले.