नवी दिल्ली,
Preparations for the 2027 Census भारताच्या आगामी जनगणना २०२७ची तयारी वेगाने सुरू झाली असून केंद्रीय गृह मंत्रालयाने नागरिकांकडून माहिती संकलित करण्यासाठी ४० प्रश्नांची यादी अधिसूचित केली आहे. जनगणना अधिनियम, १९४८ मधील कलम ८च्या उपकलम (१) अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून केंद्र सरकारने ही अधिसूचना जारी केली आहे.या प्रक्रियेत जनगणना अधिकारी त्यांच्या नियुक्त स्थानिक क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबाकडून ‘हाउसहोल्ड शेड्यूल’ म्हणजेच कुटुंब अनुसूचीच्या माध्यमातून विविध प्रकारची माहिती घेणार आहेत. नागरिकांची वैयक्तिक माहिती, सामाजिक आणि शैक्षणिक स्थिती, रोजगार, स्थलांतर तसेच काही ओळखपत्रांशी संबंधित तपशील या प्रक्रियेत विचारला जाणार आहे. जनगणना अधिकाऱ्यांकडून सर्वप्रथम व्यक्तीचे नाव, कुटुंबातील प्रमुखाशी असलेले नाते, लिंग, जन्मतारीख आणि पूर्ण वर्षांतील वय याबाबत माहिती घेतली जाईल. त्यानंतर सध्याची वैवाहिक स्थिती, विवाहाच्या वेळीचे वय आणि जीवनसाथीचे नाव विचारले जाणार आहे.नागरिकांची सांगितलेली राष्ट्रीयत्वाची माहिती, धर्म तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा जात यासंबंधीचा तपशीलही नोंदवला जाणार आहे. याशिवाय वडील आणि आईची माहिती तसेच दिव्यांगत्वासंबंधीची माहिती घेण्यात येईल.
भाषा आणि शिक्षणाशी संबंधित प्रश्नांमध्ये मातृभाषा, इतर ज्ञात भाषा, साक्षरता आणि डिजिटल साक्षरतेची स्थिती यांचा समावेश आहे. व्यक्ती सध्या कोणत्याही शिक्षण संस्थेत शिकत आहे की नाही, त्याने घेतलेली सर्वोच्च शैक्षणिक पात्रता आणि संबंधित शाखा किंवा विषयाची माहितीही नोंदवली जाणार आहे.रोजगाराशी संबंधित माहितीही जनगणनेत महत्त्वाची ठरणार आहे. मागील वर्षात संबंधित व्यक्तीने काम केले होते का, त्याची आर्थिक गतिविधी कोणत्या प्रकारची आहे, व्यवसाय काय आहे आणि उद्योग, व्यापार किंवा सेवा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, असे प्रश्न विचारले जातील. कामगाराचा वर्ग तसेच सीमांत, अर्ध-सीमांत आणि गैर-कामगार व्यक्तींच्या गैर-आर्थिक कामकाजाची माहितीही घेतली जाईल. कामाच्या शोधात असलेल्या किंवा कामासाठी उपलब्ध असलेल्या व्यक्तींबाबतही माहिती नोंदवली जाईल. त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी व्यक्ती कोणत्या प्रकारे प्रवास करते, याची माहितीही घेतली जाणार आहे.स्थलांतराशी संबंधित माहितीमध्ये जन्मस्थान, यापूर्वी राहत असलेले ठिकाण, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्यामागील कारण आणि शेवटच्या स्थलांतरानंतर संबंधित गाव किंवा शहरात किती काळापासून वास्तव्य आहे, हे विचारले जाणार आहे. कायमस्वरूपी निवासी पत्त्याची माहितीही नोंदवली जाईल.
महिलांशी संबंधित काही विशिष्ट प्रश्नही या अनुसूचीत आहेत. सध्या विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा विभक्त राहणाऱ्या महिलांकडून सध्या जिवंत असलेल्या मुलांची संख्या आणि आतापर्यंत जिवंत जन्मलेल्या मुलांची एकूण संख्या विचारली जाणार आहे. सध्या विवाहित महिलांकडून मागील एक वर्षात जिवंत जन्मलेल्या मुलांची संख्याही नोंदवली जाईल.याशिवाय कोविड-१९ लसीकरणासंबंधी माहिती, कुटुंबातील एकूण बँक खात्यांची संख्या आणि उपलब्ध असल्यास मोबाइल क्रमांकाची माहितीही घेतली जाणार आहे. आधार क्रमांक, मतदार ओळखपत्र क्रमांक, भारतीय पासपोर्टधारक असल्यास पासपोर्ट क्रमांक आणि वाहन चालविण्याचा परवाना उपलब्ध आहे की नाही, याबाबतही प्रश्न विचारले जाणार आहेत. केंद्र सरकारच्या या अधिसूचनेमुळे जनगणना २०२७मध्ये नागरिकांकडून कोणत्या प्रकारची माहिती घेतली जाणार आहे, याचे चित्र स्पष्ट झाले आहे. देशातील लोकसंख्या, सामाजिक रचना, शिक्षण, रोजगार, स्थलांतर आणि नागरिकांच्या विविध परिस्थितीविषयी अधिक व्यापक माहिती संकलित करण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात आहे.