‘प्रीतम अँड पेद्रो’चा ओटीटीवर धुमाकूळ!

    दिनांक :14-Aug-2026
Total Views |
मुंबई,
pritam and pedro प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी निर्माता म्हणून पहिल्यांदाच वेबविश्वात पाऊल ठेवले आणि त्यांच्या ‘प्रीतम अँड पेद्रो’ या मालिकेने ओटीटीवर मोठे यश मिळवले आहे. अर्शद वारसी आणि वीर हिरानी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेने २०२६ मध्ये भारतातील सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या ओटीटी मालिकांमध्ये अव्वल स्थान मिळवल्याचा दावा करण्यात आला आहे. मालिकेला IMDb वर ७.८ रेटिंग मिळाले असून तिचे एकूण व्ह्यूज २७ दशलक्षांपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे.
 
pritam and pedro
  
‘प्रीतम अँड पेद्रो’च्या लोकप्रियतेमागे त्याचे वेगळे कथानक, विनोद, सस्पेन्स आणि सायबर क्राईमची पार्श्वभूमी महत्त्वाची ठरली आहे. ओरमॅक्स ओटीटी कंटेंट इनसाइट्सच्या अहवालानुसार, मालिकेला आतापर्यंत २३ दशलक्षांहून अधिक युनिक व्ह्यूअर्स मिळाले आहेत, तर एकूण व्ह्यूजची संख्या २७ दशलक्षांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मालिकेला ओरमॅक्स पॉवर रेटिंगमध्ये ७६ गुण मिळाले आहेत. विशेष म्हणजे, २०२४ पासून भारतातील सर्वाधिक पाहिली जाणारी नॉन-फ्रँचायझी हिंदी वेब सिरीज म्हणूनही ‘प्रीतम अँड पेद्रो’ने आपले स्थान निर्माण केल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या मालिकेच्या यशाकडे ओटीटी विश्वातील महत्त्वपूर्ण कामगिरी म्हणून पाहिले जात आहे.
 
मालिकेच्या कथानकातील साधेपणा, हलकाफुलका विनोद आणि सामाजिक संदेश यामुळे वेगवेगळ्या वयोगटांतील प्रेक्षकांशी तिची नाळ जोडली गेल्याचे सांगितले जाते. घरांमध्ये कनेक्टेड टीव्हीचा वाढता वापर आणि कुटुंबासोबत पाहता येणाऱ्या आशयाची मागणी याचाही मालिकेला फायदा झाल्याचे मानले जात आहे. प्रदर्शनाच्या सुरुवातीलाच ‘प्रीतम अँड पेद्रो’ने जिओहॉटस्टारवरील स्क्रिप्टेड शोसाठी सर्वात मोठ्या ओपनिंगचा विक्रम केल्याचा दावा आहे. सायबर क्राईम, विनोद आणि सस्पेन्स-थ्रिलर यांचे मिश्रण असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवले आहे.
 
अर्शद वारसी आणि वीर हिरानी यांच्या जोडीचेही विशेष कौतुक होत आहे. त्यांच्या पडद्यावरील केमिस्ट्रीमुळे मालिकेला देशभरातील प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. हिंदीसोबतच तमिळ, तेलगू, मल्याळम, बंगाली, मराठी आणि कन्नड अशा सात भारतीय भाषांमध्येही ही मालिका ट्रेंडिंगमध्ये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सध्या ‘प्रीतम अँड पेद्रो’ जिओहॉटस्टारवर प्रदर्शित होत असून, मिळत असलेल्या प्रतिसादामुळे मालिकेने भारतीय ओटीटी विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. राजकुमार हिरानी यांचे निर्मिती क्षेत्रातील पदार्पण आणि अर्शद वारसीच्या अभिनयाची जादू या दोन्हींचा संगम मालिकेच्या यशाचे प्रमुख आकर्षण ठरले आहे.