बुलढाणा,
prataprao-jadhav : जिल्ह्यातील दुर्गम, आदिवासीबहुल आणि डोंगराळ भागातील ग्रामपंचायतींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बुलढाणा जिल्हा परिषदेने राबविलेले सीईओ संग्राम अभियान संवेदनशील ग्राम हे राज्यासाठी एक दिशादर्शक आणि अभिनव पाऊल आहे. असे प्रतिपादन केंद्रिय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.

या अभियानांतर्गत गर्दे वाचनालय दि. १४ ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणार्या ११० ग्रामपंचायतींचा आज प्रत्येकी ५१ हजार रुपये देऊन गौरव करण्यात आला. याच सोहळ्यात जिल्हा परिषदेच्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या ’मिशन झेड आणि मोफत स्पर्धा परीक्षा वर्गांचेही त्यांनी भरभरून कौतुक केले. या विशेष गौरव सोहळ्याला पालकमंत्री मकरंद पाटील, आ. संजय गायकवाड, आ. श्वेता महाले, आ. मनोज कायंदे, आ. सिद्धार्थ खरात, नगराध्यक्षा पूजा गायकवाड, अॅड. नाझर काझी, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात आणि जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांची प्रमुख उपस्थिती होती. अनेक गावे लोकवर्गणी आणि शासकीय योजनांची योग्य सांगड घालून विकासाच्या स्पर्धेत यशस्वी वाटचाल करत आहेत, ही बाब राज्याच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. याच धर्तीवर इतरही गावांनी आर्थिकदृष्ट्या समृद्ध होण्यासाठी आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अशा अभियानांमध्ये हिरीरीने सहभागी व्हावे, असा विश्वास केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त करून ग्रामविकासाच्या चळवळीला गती देण्याचे आवाहन केले.
पालकमंत्री मकरंद पाटील म्हणाले की सीईओ संग्राम अभियानांतर्गत झालेल्या श्रमदानातून आणि लोकसहभागातून गावांमध्ये कोट्यवधी रुपयांची विकासकामे व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत थेट न टिकू शकणार्या दुर्गम गावांसाठी मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी (सीईओ) राबविलेला हा स्वतंत्र उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. या अभियानात २०० पेक्षा जास्त गावांपैकी ११० उत्कृष्ट ग्रामपंचायतींची निवड करून त्यांना प्रत्येकी ५१ हजार रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याकामी एकूण ५६.१० लाख रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात आले आहे. यात सर्वाधिक गुण प्राप्त करणार्या सिंदखेड राजा तालुयातील ’शेंदुर्जन’ ग्रामपंचायतीचा मंचावर विशेष गौरव करण्यात आला. यावेळी मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते या विद्यार्थी मित्रांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व त्यांच्या पुढील वाटचालीस प्रोत्साहन देण्यात आले. भविष्यात बुलढाणा जिल्हा परिषद राज्याच्या सर्व उपक्रमांमध्ये प्रथम क्रमांकावर राहील अशी अपेक्षाही मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी केले. त्यांचा सपत्नीक सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन, प्रकल्प संचालक पांडुरंग कोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम पंचायत) शिवशंकर भारसाकळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा प्र वि.) आशिष पवार, मुलेविअ प्रकाश राठोड, समाजकल्याण अधिकारी प्रमोद एंडोले, कार्यकारी अभियंता सुशील गुडदे, कार्यकारी अभियंता स्नेहल माने, शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी प्रयत्न केले.