स्वातंत्र्यलढ्यात तळेगावच्या भूमीचे अमूल्य योगदान

१९३० च्या जंगल सत्याग्रहाच्या इतिहासाला स्वातंत्र्यदिनी उजाळा

    दिनांक :14-Aug-2026
Total Views |
गोपाल चिकाटे
 
तळेगाव (श्या.पंत),
independence day देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात तळेगाव (श्यामजीपंत) येथील भूमीला महत्त्वपूर्ण स्थान आहे. ब्रिटिशांच्या अन्यायकारक जंगल कायद्यांविरोधात १ ऑगस्ट १९३० रोजी येथे जंगल सत्याग्रहाला सुरुवात झाली. नागपूर प्रांतिक युद्ध मंडळाने तळेगावची प्रथम प्रांतिक केंद्र म्हणून निवड केली होती. गणपत टिकेकर व श्रीधर दाते यांच्या नेतृत्वाखाली हजारो स्वयंसेवक व स्वातंत्र्यसैनिक या आंदोलनात सहभागी झाले होते. उपलब्ध ऐतिहासिक संदर्भांमध्ये तळेगावच्या जंगल सत्याग्रहाची वर्धा जिल्ह्यातील मोठ्या आंदोलनांपैकी एक म्हणून नोंद आहे.
 
independence day
 
जंगल, जमीन आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवर ब्रिटिशांनी लादलेल्या निर्बंधांविरोधात सामान्य जनतेने केलेला हा लढा केवळ जंगल कायद्याविरोधातील आंदोलन नव्हता तर स्वाभिमान, जनअधिकार आणि स्वातंत्र्याची जाणीव जागविणारा संघर्ष होता. तळेगावातून सुरू झालेल्या या आंदोलनाला पुढे वर्धा, अमरावती, चंद्रपूर व भंडारा परिसरांतही प्रचंड प्रतिसाद मिळाला. तळेगावच्या या ऐतिहासिक योगदानाची आठवण जिवंत ठेवण्यासाठी स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षांनी जंगल सत्याग्रहाच्या भूमीवर २०१८ मध्ये जि.प.च्या तत्कालीन सदस्य अंकीता होले यांच्या हस्ते सत्याग्रहस्थळी ध्वजारोहण करून इतिहासाचे पुन्हा स्मरण करण्यात आले. या इतिहासाच्या जतनासाठी स्थानिक पातळीवर संशोधन व जनजागृतीचे कार्यही सुरू असल्याची माहिती भाजपाचे ज्येष्ठ नेते सचिन होले यांनी दिली.
 
स्वातंत्र्य म्हणजे केवळ १५ ऑगस्टला ध्वजवंदन नव्हे तर स्वातंत्र्यासाठी आपल्या गावच्या भूमीतून लढलेल्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण आणि त्यांच्या इतिहासाचे जतन करणे ही देखील आपली जबाबदारी आहे, अशी भावना जंगल सत्याग्रह स्मारक समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आली. या ऐतिहासिक आंदोलनाशी संबंधित जुने दस्तऐवज, शासकीय नोंदी, कारावास प्रमाणपत्रे, वर्तमानपत्रातील कात्रणे, पुस्तके, पत्रव्यवहार किंवा स्थानिक पातळीवरील विश्वसनीय माहिती नागरिकांकडे असल्यास ती समितीपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन जंगल सत्याग्रह स्मारक समितीचे सचिन होले यांनी केले आहे.
 
 
उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तळेगावच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचे अधिक शास्त्रशुद्ध दस्तऐवजीकरण करण्याचा समितीचा प्रयत्न आहे. तळेगावच्या या पवित्र भूमीने स्वातंत्र्याच्या लढ्यात दिलेले योगदान पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणे, हेच स्वातंत्र्यदिनाचे खरे स्मरण ठरेल. आष्टी शहीद हे तालुक्याचे ठिकाण असून क्रांती भूमी म्हणून ओळखले जाते. सन १९२७ मध्ये इंग्रजांनी वन कायदा केला मात्र या कायद्यात नागरिकांचे हक्क गोठविण्यात आले होते. त्या कायद्याविरोधात तसेच जल जमीन आणि जंगल वाचविण्याकरिता तळेगाव श्यामजी पंत येथे शेकडो नागरिकांनी हातात मशाली घेऊन १ ऑगस्ट १९३० रोजी नागपूर अमरावती रोडवरील गारगोटी माथ्यावर जंगल सत्याग्रह केला होता. पंधरा दिवस चाललेल्या या सत्याग्रह दरम्यान अनेकांनी आंदोलनाला भेट दिली जिल्ह्यात सर्वात मोठे आंदोलन म्हणून तळेगाव जंगल सत्याग्रहाची नोंद आहे.