स्वातंत्रवीर सावरकर प्रकरणात राहुल गांधींना मोठा दिलासा!

सर्वोच्च न्यायालयाने समन्स केले रद्द

    दिनांक :14-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली.
Relief for Rahul Gandhi in the Savarkar case. स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याशी संबंधित कथित मानहानीच्या प्रकरणात काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. लखनौ येथील न्यायालयाने राहुल गांधी यांच्याविरोधात जारी केलेले समन्स सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहेत. या प्रकरणात उत्तर प्रदेश सरकारकडून आवश्यक परवानगी घेण्यात आल्याची नोंद उपलब्ध नसल्याचे प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट झाल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय घेतला. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या खंडपीठासमोर झाली. उत्तर प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात या प्रकरणात खटला चालवण्यासाठी आवश्यक परवानगी घेतल्याची कोणतीही नोंद नसल्याचे नमूद केले होते.सरकारच्या प्रतिज्ञापत्राची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने लखनौ न्यायालयातील मानहानीची तक्रार आणि त्यावर दंडाधिकाऱ्यांनी दिलेले आदेश रद्द केले. त्यामुळे राहुल गांधी यांच्याविरोधात या प्रकरणात सुरू झालेली न्यायालयीन प्रक्रिया आता थांबली आहे.
 
 
 
Relief for Rahul Gandhi in the Savarkar case.
 
या प्रकरणाच्या आधीच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या काही वक्तव्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. सार्वजनिक जीवनातील व्यक्तींनी वक्तव्य करताना अधिक जबाबदारीने वागण्याची गरज असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यानंतर न्यायालयाने राहुल गांधी यांना अंतरिम दिलासा देत एसीजेएम न्यायालयाने जारी केलेल्या समन्सला स्थगिती दिली होती.आता उत्तर प्रदेश सरकारने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. आवश्यक परवानगी घेतल्याचे कोणतेही दस्तऐवजीकरण किंवा नोंद नसल्याने तक्रार आणि त्यावर आधारित न्यायालयीन आदेश कायम ठेवता येणार नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून स्पष्ट झाले. राहुल गांधी यांच्याविरोधातील ही कारवाई विनायक दामोदर सावरकर यांचा कथित अपमान केल्याच्या आरोपावरून सुरू झाली होती. लखनौ न्यायालयाने या प्रकरणात त्यांना समन्स बजावले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या आदेशामुळे राहुल गांधींना या प्रकरणात दिलासा मिळाला आहे.