मुंबई
ritesh deshmukh अभिनेता रितेश देशमुख हा त्याच्या सिनेमांपेक्षा खासगी आयुष्य आणि सोशल मीडिया पोस्टमुळे अनेकदा चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा त्याची अशीच एक पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत रितेशने वडिलांच्या स्मृतींना भावपूर्ण उजाळा दिला आहे. त्यासोबत लिहिलेल्या कॅप्शनने अनेकांचे डोळे पाणावले.
आज, 14 ऑगस्ट रोजी विलासराव देशमुख यांची 14 वी पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने रितेशने वडिलांसोबतचा एक फोटो पोस्ट केला. या फोटोसोबत त्याने लिहिलं, ‘तुम्हाला जाऊन 14 वर्षं झाली आहेत… माझा वनवास काही संपलेला नाही…’ रितेशच्या या भावुक शब्दांनी त्याच्या मनातील वडिलांविषयीची ओढ आणि त्यांच्या जाण्याचं दुःख पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.
रितेशच्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेत्री जिनिलिया देशमुख हिने कमेंटमध्ये तुटलेल्या हृदयाचे इमोजी पोस्ट केले आहेत. अनेक कलाकारांनीही रितेशच्या पोस्टवर कमेंट करत विलासराव देशमुख यांना आदरांजली वाहिली आहे.
नेटकऱ्यांनीही या पोस्टवर भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने, ‘लातूर म्हणजे साहेब अन् साहेब म्हणजे लातूर…’ अशी भावना व्यक्त केली. तर दुसऱ्याने, ‘तुळजापूरच्या विकासामध्ये योगदान अमूल्य आहे… विकास प्राधिकरण साहेबांनी सुरू केले,’ असं म्हणत विलासराव देशमुख यांच्या कार्याची आठवण करून दिली. ‘माणूस जातो, पण त्याचं कर्तृत्व कधीच मरत नाही… विलासराव साहेब,’ अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली. तर रितेशचं कौतुक करताना एका चाहत्याने, ‘सुपुत्र असावा तर तुझ्यासारखा… वडिलांवर प्रेम करावं तर असं…’ असं म्हटलं आहे.
रितेश देशमुख आपल्या वडिलांच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त नियमितपणे सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. जिनिलिया देखील अशा प्रसंगी विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा देत असते. वडिलांप्रती असलेला जिव्हाळा आणि आदर या पोस्टमधून सातत्याने दिसून येतो.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं निधन 14 ऑगस्ट रोजी झालं होतं. त्यांनी वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त रितेशने शेअर केलेल्या या भावुक पोस्टमुळे वडिलांच्या आठवणी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.