यूएसएस लिंकनवरील खलाशांच्या स्थितीने चिंता वाढली

    दिनांक :14-Aug-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
Sailors on the USS Lincoln अमेरिकेच्या यूएसएस अब्राहम लिंकन या विमानवाहू जहाजावरील खलाशांच्या दीर्घकाळ चाललेल्या तैनातीमुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. काही खलाशांनी समुद्रात उडी मारण्याचा प्रयत्न केल्याच्या वृत्तांनंतर या विमानवाहू जहाजावरील परिस्थिती पुन्हा चर्चेत आली आहे. दरम्यान, अमेरिकेने यूएसएस अब्राहम लिंकनच्या जागी यूएसएस जॉर्ज वॉशिंग्टनला मध्य-पूर्वेकडे पाठवण्याची तयारी सुरू केल्याचे वृत्त आहे.अमेरिकन नौदलाच्या निवेदनांनुसार आणि जहाजाच्या हालचालींची माहिती असलेल्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, यूएसएस जॉर्ज वॉशिंग्टन नुकतेच व्हिएतनाममधील दा नांग येथून रवाना झाले आहे. सिंगापूर सामुद्रधुनी आणि मलाक्का सामुद्रधुनीमार्गे प्रवास केल्यानंतर हे जहाज आता हिंद महासागराच्या दिशेने पुढे जात आहे.
 
 
456
 
 
वृत्तांनुसार, यूएसएस अब्राहम लिंकनवरील काही खलाशांनी समुद्रात उडी मारण्याचा विचार केल्याच्या किंवा तसा प्रयत्न केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. एका प्रकरणात एका खलाशाला दुसऱ्या सहकाऱ्याने असे पाऊल उचलण्यापासून रोखल्याचे सांगितले जाते. या घटनांमुळे खलाशांच्या कुटुंबीयांमध्येही त्यांच्या मानसिक आरोग्याबाबत चिंता निर्माण झाली आहे.डेमोक्रॅटिक काँग्रेस सदस्य माईक लेविन यांनी जहाजावरील परिस्थितीबाबत गंभीर दावे केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही ठिकाणी बुरशी लागलेले शॉवर, खराब शौचालये आणि अनेक आठवड्यांपासून बंद असलेली लॉन्ड्री यामुळे खलाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर बराच काळ गरम पाण्याची कमतरता असल्याचेही त्यांनी सांगितले. अन्नाबाबतही तक्रारी असून काही खलाशांना फक्त अर्धा कप भात आणि दोन टॉर्टिला मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. साबण, डिओडोरंट आणि टूथपेस्टसारख्या मूलभूत वस्तूंचीही कमतरता असल्याचे लेविन यांनी म्हटले आहे.
 
 
 
गेल्या गुरुवारी सॅन दिएगो येथे जवळपास २०० कुटुंबीयांच्या उपस्थितीत टाऊन हॉल बैठक घेण्यात आली. या बैठकीत अॅनाबेल लोमा यांनी आपल्या पतीबाबत चिंता व्यक्त केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या पतीने त्याच दिवशी संदेश पाठवून दुसऱ्या दिवशी सकाळी उठता येईल की नाही याबाबत निराशाजनक भावना व्यक्त केली होती. वृत्तानुसार, तैनातीचा कालावधी वारंवार वाढल्यानंतर त्यांच्या पतीने समुद्रात उडी मारण्याचा प्रयत्न केल्याचे लोमा यांनी सांगितले.मात्र, अमेरिकी नौदलाने जहाजावरील आत्महत्येच्या विचारांमध्ये किंवा प्रयत्नांमध्ये वाढ झाल्याचे नाकारले आहे. वृत्तानुसार नौदलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, कमांडकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार अशा घटनांमध्ये कोणतीही वाढ झालेली दिसत नाही. खलाशांचे आरोग्य आणि कल्याण हे नौदलाच्या प्राथमिकतेत असल्याचेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले. जहाजावर स्वच्छ पाणी, कार्यरत वातानुकूलन व्यवस्था आणि आरोग्यदायी अन्नाचे पर्याय उपलब्ध करून दिले जात असल्याचा दावा नौदलाने केला आहे.
 
 
 
दरम्यान, विमानवाहू जहाज बदलण्याचा निर्णय अब्राहम लिंकनवरील परिस्थितीशी थेट संबंधित नसल्याचे अमेरिकी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. वृत्तानुसारअधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्वनियोजित फेरबदलाचा भाग असल्याचे सांगितले. मात्र, लिंकनवरील खलाशांनी २५० दिवसांहून अधिक काळ समुद्रात घालवल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या थकव्याबाबत आणि राहणीमानाबाबत कुटुंबीय तसेच काही कायदेकर्त्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. अणुऊर्जेवर चालणाऱ्या यूएसएस अब्राहम लिंकनवर सुमारे ५,००० खलाशी आणि मरीन सैनिक तैनात आहेत. हे जहाज २१ नोव्हेंबर रोजी सॅन दिएगो येथून रवाना झाले होते. सुरुवातीला या तैनातीचे नियोजन पॅसिफिक महासागर क्षेत्रासाठी करण्यात आले होते. मात्र, बदललेल्या परिस्थितीमुळे या तैनातीचा कालावधी वाढत गेला आणि आता जहाजाच्या जागी यूएसएस जॉर्ज वॉशिंग्टन पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.