अकोला,
spurious seeds बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणी संबंधित शेतकऱ्यांनी तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडे दाखल १० हजार ४८५ तक्रारींपैकी ९ हजार ३२१ तक्रारींची पडताळणी झाली असून ८ हजार ९२५ तक्रारीत क्षेत्रीय अधिकारी व समितीने केलेल्या तपासणीत तथ्य आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून यामुळे १२ हजार १५५ हेक्टर अर्थात ३० हजार ३८७ एकरावर क्षेत्र बाधित झाल्याचे समोर आले आहे.त्यामुळे संबंधित बियाणे कंपन्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

यंदाच्या खरीप हंगामात आधीच पावसाने हुलकावणी दिली,त्यामुळे विलंबाने शेतकऱ्यांनी पेरणी केली.मात्र काही ठिकाणी बियाणे अंकुरले नसल्याने फसवा जाहिराती च्या नावाखाली बियाणे कंपन्यांनी बोगस सोयाबीनचे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले,कृषी अधिकाऱ्यांनी बियाण्यांचे नमुने अधिकृत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले असता तपासणी दरम्यान पॅकेटवर केलेला दावा बियाणे नियम दिशाभूल करणारा तसेच नमुन्यांच्या विश्लेषणात संबंधित बियाण्यांची गुणवत्ता निर्धारित निकषांनुसार नसल्याचा अहवाल यापूर्वीच प्राप्त झाला होता, जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधींनी देखील याबाबत बैठका घेतल्या.विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात देखील हे प्रकरण चांगलेच गाजले होते. कृषिमंत्र्यांनी याची दखल घेऊन कारवाईचे आश्वासन दिले असल्याने आता या प्रकरणाकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागून आहे.
कंपन्यांच्या अडचणीत वाढ
बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणी रवी सीड्स, बुस्टर प्लैंट जेनेटिक्स स्युअर सीड्स, महालक्ष्मी क्रॉप, ओसवाल सीड्स, विगर सीड्स, इगल सीड्स, ऑस्कर सीड्स, ग्रीन गोल्ड सीड्स, दफ्तरी सीड्स, अंकुर सीड्स, बाफना सीड्स या कंपन्यांवर रामदास पेठ, सिटी कोतवाली, एमआयडीसी, तेल्हारा, अकोट शहर, मुर्तीजापुर शहर, बार्शीटाकळी, बाळापूर व पातुर पोलीस ठाण्यात १३ गुन्हे दाखल आहेत.याप्रकरणी सखोल तपासासाठी अकोला पोलिस दलाने अप्पर पोलीस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी गठित केली आहे. तक्रारीत तथ्य आढळल्याने संबंधित कंपन्यांच्या अडचणीत देखील आता वाढ झाली आहे.
सोयाबीन बियाणे अंकुरले नसल्याच्या तक्रारी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडे केल्या आहेत.क्षेत्रीय अधिकारी व समितीकडून तक्रारींची तपासणी अंतिम टप्प्यात आहे.याप्रकरणी लवकरच शासनाला अहवाल सादर करण्यात येईल.
-डॉ.तुषार जाधव
प्र.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला
तालुका तथ्य आढळलेल्या तक्रारी
अकोला. १३९८
बार्शीटाकळी १४५४
मूर्तीजापुर २४१६
अकोट १२
तेल्हारा ८४१
बाळापुर १२३२
पातुर १५७२
एकूण ८९२५